Breaking News

शहिदांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये आणि दोन हेक्टर जमीन देणार

शौर्य-सेवा पदक धारकांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय सैन्याने देशाची मान आपल्या शौर्याने जगात गौरवाने उंचाविली आहे. यात शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे, अशा शब्दात भारतीय सैन्य दलाचा गौरव करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शहीद वीरांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचे अनुदान आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ केल्याचे जाहीर केले.

अथर्व फाऊंडेशनच्यावतीने वन फार ऑल अण्ड ऑल फार वन उपक्रमांतर्गत आयोजित ‘अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अॅण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी, आमदार आशिष शेलारसह अनेक निवृत्ती लष्करातील अधिकारी होते.

शहीद वीरांच्या कुटुंबियांच्या त्यागाला वंदन करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. हा केवळ त्यांचा सन्मान नव्हे, तर देशाचाही सन्मान आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपले जवान चोवीस तास सज्ज असतात. वेळ आल्यास हे जवान आपल्या प्राणाचीही आहुती देतात. त्यामुळे अशा जवानांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावीच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर भारतीय सेना कार्यरत आहे. केवळ मातृभूमीसाठी समर्पण हेच ते आपले जीवन मानले आहे. भारतानेही केवळ वीरता आणि त्यागाचीच पूजा केली आहे. वीर जवानांच्या हौतात्म्यांचे तसे मोल करता येणार नाही. पण या कुटुंबियांसाठी योगदान देणे हे कर्तव्यच मानावे लागेल. याच कृतज्ञतेपोटी शहीद वीरांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच शहिदांच्या कुटुंबियांना त्याच जिल्ह्यात शेतीसाठी दोन हेक्टर जमीन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. याशिवाय शौर्यपदक आणि सेवा पदक विजेत्यांसाठी एकरकमी पुरस्कारांच्या रोख अनुदानात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मरणोत्तर शौर्य आणि सेवापदक धारण करणाऱ्यांच्या कुटुंबियांच्या मासिक अनुदानातही दुप्पटीने वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईकद्वारे आपले शौर्य दाखवून दिले आहे. तसेच डोकलाम मध्ये जाऊन चिनी सैन्यालाही आपली ताकद दाखविली आहे. सेना दलाने भारताची जगभरातील प्रतिमा आपल्या शौर्याने आणखी उंचावली आहे, असा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, आपल्या तिन्ही सेना दलातील सैनिक अतिशय प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी सज्ज राहतात. प्रसंग आल्यास हौतात्म्यही पत्करतात. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठिशीही खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. अंतर्गत नक्षलवाद असो की सीमेवरील लढाई असो या सैनिकांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. त्यामुळेच भारताची अखंडता आणि एकात्मता अबाधित आहे. लोकशाहीला आव्हान देणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यापर्यंत विकास पोहचविण्याचा केंद्र आणि राज्य सरकार अविरतपणे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सामाजिक आर्थिक विकासाच्या पर्यांयांचाही अवलंब केला जातो. स्वराज्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग केला आहे. त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. आता या स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याची जबाबदारी आहे. त्याच अनुषंगाने या शुरांच्या त्यागाप्रती कृतज्ञ रहावे लागेल. त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागालाही अभिवादन करावे लागेल. असे कार्यक्रम नव्या पिढीसाठी राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

महाराष्ट्र गौरव पुरस्कार

अ.क्र. शौर्यपदक पुरस्कार सध्या दिली जाणारी एकूण रक्कम 2017-18 (रुपये) अनुदानाची सुधारित रक्कम (रुपये)
  शौर्यपदकाचे नाव    
1 परमवीर चक्र 30 लाख 60 लाख
2 अशोक चक्र 30 लाख 60 लाख
3 सर्वोत्तम युद्ध सेवा पदक 18 लाख 36 लाख
4 महावीर चक्र 18 लाख 36 लाख
5 किर्ती चक्र 18 लाख 36 लाख
6 उत्तम युद्ध सेवा पदक 12 लाख 24 लाख
7 वीर चक्र 12 लाख 24 लाख
8 शौर्य चक्र 12 लाख 24 लाख
9 युद्ध सेवा पदक 12 लाख 24 लाख
10 सेना/नौसेना/वायु सेना पदक 6 लाख 12 लाख
11 मेन्शन इन डिस्पॅच 3 लाख 6 लाख
  सेवापदकाचे नाव    
12 परम विशिष्ट सेवा पदक 2.04 लाख 4 लाख
13 अति-विशिष्ट सेवा पदक 1.03 लाख 2 लाख
14 सेना/नौसेना/वायु सेना पदक 0 1.50 लाख
15 विशिष्ट सेवा पदक 40 हजार 1 लाख
16 मेन्शन इन डिस्पॅच 0 50 हजार

मरणोत्तर शौर्यपदक धारकांवर अवलंबून असणाऱ्या विधवा/अवलंबिताना

सुधारित दरानुसार मासिक अनुदान

अ.क्र. शौर्यपदक पुरस्कार सन 2017-18 मध्ये दिले जाणारे मासिक अनुदान (रुपये) अनुदानाची सुधारित रक्कम (रुपये)
  शौर्यपदकाचे नाव    
1.      परमवीर चक्र 16,500 33,000
2.      अशोक चक्र 13,200 26,500
3.      सर्वोत्तम युद्ध सेवा पदक 12,540 25,000
4.     महावीर चक्र 12,540 25,000
5.     किर्ती चक्र 9,900 20,000
6.      उत्तम युद्ध सेवा पदक 8,580 17,000
7.     वीर चक्र 7,260 14,500
8.     शौर्य चक्र 4,620 9,000
9.      युद्ध सेवा पदक 3,960 8,000
10.  सेना/नौसेना/वायु सेना पदक 2,640 5,500
11.  मेन्शन इन डिस्पॅच 1,320 2,500
12.  व्हिक्टोरिया क्रॉस 13,200 26,500

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *