Breaking News

… तर मंत्र्यांना दावणीला बांधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे आवाहन

जालना – घनसावंगी : प्रतिनिधी

दुष्काळी भागातील जनावरांच्या छारा छावण्यांना द्यायला पैसै सरकारकडे नाहीत. जनावरं मेल्यावर पैसे देणार का? असा सवाल करतानाच या सरकारकडे पैसै नसतील आणि जर सरकारचे मंत्री देतो सांगण्यासाठी येत असतील तर त्या मंत्र्यांना दावणीला बांधा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घनसावंगी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी चारा व छावण्या मागितल्या आणि यांनी डान्सबार आणि लावण्या दिल्या … गायीला वाचवा आणि बाईला नाचवा असे हे भाजप सरकार असल्याची जोरदार टिकाही त्यांनी केली.

दिल्लीत आणि राज्यातील सरकार संविधान विरोधी आहे. हे सरकार काय खायचं काही नाही हे सांगून वातावरण बिघडवत आहे. हे काय चाललंय या राज्यात… सरकार संवेदनाहीन झाले आहे.

घटनेने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मी बोलणार…माझं बोलणं कुणीही थांबवू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  

ज्याने खेळण्यातील विमान कधी बनवलं नाही. त्याला राफेल विमान बनवण्याचा काम देण्यात आले. काय चाललं आहे या देशात अशा सवाल करत मोदी ज्या वयात चहा विकत होते. त्याचा शोध घेण्यात आला, त्यावेळी त्याठिकाणी रेल्वे स्टेशनच नव्हते मग यांनी चहा विकली कुठे अशी खिल्लीही त्यांनी उडवली. 

योगी नरेंद्रचा एकच नारा..ना घर बसा है हमारा ना बसने देंगे तुम्हारा असा जबरदस्त टोला लगावत चुनावी जुमला चालू आहे. ओबीसी मुलांची शिष्यवृत्ती भरली गेली नाहीच. शिवाय विकासाचा मुद्दा यांच्याकडे नाही. त्यामुळे जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे कामे होतील. त्यामुळे सावध रहा असे आवाहनही त्यांनी केले.

गरीबांचे अश्रू पुसु शकत नाही… महिलांना न्याय देवू शकत नाही.. नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी सुरू आहे. तुमच्या भावनांशी खेळ सुरू असल्याची टीका त्यांनी केला.

शेतकर्‍यांना कर्जमाफी देणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार – जयंतराव पाटील

या देशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा एकच नेता शरद पवार आहेत परंतु या सरकारने शेतकऱ्यांना फुटी कवडीही दिली नाही असा आरोप प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी  केला.

पाच वर्ष झाली काळा पैसा आलेला नाही. या सरकारने फसवलं आहे अशी मानसिकता देशातील जनतेची झाली आहे. हीच जनता आता यासरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही.

भाजपने साडेचार वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण केली की नाही याची विचारणा जमलेल्या तमाम जनतेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. त्यावेळी तमाम जनतेमधून एकच उत्तर ‘नाही’ असे आले. महाराष्ट्राच्या पापात शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे. निव्वळ विरोध करण्याचे काम करत आहेत. जर विरोध करत आहात तर सत्तेची उब का सोडवत नाही असा सवालही त्यांनी केला.

भाजपने सर्वसामान्य लोकांचं जीणं मुश्किल केले आहे – धनंजय मुंडे

या सरकारच्या काळात महागाईची झळ इतकी सोसावी लागत आहे की, सर्वसामान्य लोकांचं जीणं मुश्किल केले आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

१५ लाख रुपये आपल्या खात्यात येतील याची सुतराम शक्यता नाही. एखादा भक्त आला तर त्याला सांगा आधी २-४ लाख रुपये उसने द्या मोदींनी खात्यात १५ लाख जमा झाल्यावर देतो असे सांगा असे आवाहन त्यांनी केले.

आसूड घेवून सेनेवाले म्हणत होते देता की जाता परंतु आज शिवसेनेला देता पण येईना आणि जाताही येईना अशी अवस्था झाली. भाजपने सत्तेत असताना जे पाप केले आहे त्याच पापामध्ये शिवसेना सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. पाच मंत्र्यांच्या तुकड्यासाठी स्वाभिमानी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज लाचार झाली आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *