Breaking News

तयारीला लागा, पण कामे पूर्ण करा आढावा बैठकानंतर मुख्यमंत्र्यांचे भाजपच्या मंत्र्यांना पत्र

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारला साडे चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यातच एकाबाजूला जनतेमध्ये राज्य सरकारच्या विरोधात नाराजी पसरत आहे. तर दुसऱ्याबाजूला केंद्राच्या दुटप्पी धोरणामुळे वाढत्या महागाईला आळा घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. यापार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूकीसोबत राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जायचे की स्वतंत्ररित्या जायचे याबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चाचपणी सुरु झाले आहे. मात्र राज्यात कधीही निवडणूका होवू द्या मात्र जनतेसमोर जाताना दिसणारी कामे झाली पाहिजेत यासाठी भाजप मंत्र्यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधांबरोबरच गृहनिर्माणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच याविषयीचे पत्रही भाजप मंत्र्यांना पाठवित तयारी लागा मात्र कामे पूर्ण करा असे सांगणारे पत्र लिहिल्याची माहिती भाजपच्या एका मंत्र्याने दिली.
मागील चार वर्षात युती सरकारने कोणती कामे केली याबाबतचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. मात्र या आढाव्यात मुंबई, पुणे आणि नागपूर ही तीन शहरे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांच्या विकासाबाबत दृष्यात्मक कामे नसल्याचे दिसून आले. तसेच विकास कामांच्या बाबत अनेक निर्णय झाले. यातील किमान ५० टक्के ही कामे ही दृश्यस्वरूपात झालेली नाहीत. त्यातच जनतेच्या जिव्हाळ्याच्या दृष्टीने असलेले हक्काच्या घरांचे स्वप्न केंद्र आणि राज्य सरकारने दाखविले असले तरी राज्यातील २५ टक्के भागातही घरांची उभारणी झालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत किमान बांधून झालेल्या २ लाख घरांच्या वाटपाला स्थानिक पातळीवर सुरुवात करून उर्वरीत ठिकाणी किमान घरांच्या कामाला सुरुवात करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी भाजप मंत्र्याना केली. त्यासाठी स्थानिक पातळीवरील महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाशी सामज्ंयस वाढविण्याची सूचनाही पत्राद्वारे केली.
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेबरोबर आणि अन्य महाआघाडीतील लहान-मोठ्या पक्षांशी कितपत युती होईल याबाबत भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना खात्री नाही. त्यामुळे ऐनवेळी एकला चलो रे ची परिस्थिती निर्माण झाल्यास भाजपच्या हातातही विकास कामांचे प्रगती पुस्तक असण्यावर राज्यस्तरीय नेत्यांनी भर दिला आहे. यामुळे निवडणूकीच्या तयारी लागा पण रखडलेली विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी भाजप मंत्र्यांना केल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *