Breaking News

आमदार थोरवे आणि मंत्री भुसे यांच्यात धक्काबुक्की; असे काही नाही झालं मंत्र्यांचा खुलासा

राज्यातील शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात अनेक आमदार-खासदारांनी बंडाचे निशाण फडकावित भाजपाच्या मदतीने वेगळी चूल मांडली. परंतु आता बंडाचे निशाण फडकाविणाऱ्या आमदारांवर आणि इतर नेत्यांवर मुख्य पक्षनेतृत्वाचा वचक राहिला नाही. त्यामुळे कल्याणमधील भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दहिसर येथील माजी नगरसेवकावर गोळीबाराची घटना घडली. परंतु राज्यातील लोकशाहीचे मंदीर असलेल्या विधानसभा आमदारांच्या लॉबीतच शिंदे गटाचे एक मंत्री दादाजी भूसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात निधीवरून शाररीक झटापट झाल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र मंत्री शंभूराजे देसाई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे काही घडल्याचा इन्कार सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर केला.

वास्तविक पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने खटके उडत असल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. तसेच दोन नगरसेवकच नव्हे तर आमदार- नगरसेवकांमध्येही खटके विकास कामांच्या हद्दीवरून आणि मतदारसंघातील विकास निधी वरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा आज विधानसभेचे कामकाज सुरु असताना शिंदे गटाचे बंदरे मंत्री दादाजी भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात विकास निधीच्या वाटपावरून चांगलीच झटापट आणि पकडा पकडी झाल्याची माहिती पुढे आली. यावेळी विधानसभेच्या लॉबीतून मंत्री आणि आमदाराच्या एकमेकांना शिवीगाळ करत असल्याचे जोरजोरात आवाज लॉबीच्या बाहेर ऐकायला येत होते. तसेच एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याची सांगण्यात येत आहे.

यावेळी शिंदे गटाचे आणखी एक मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने मध्यस्थी करत आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादाजी भूसे यांच्यातील वाद सोडविला असल्याचेही सांगितले. परंतु हे वृत्त वाऱ्यासारखे बाहेर पसरल्यानंतर शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की त्या दोघांमध्ये चर्चा सुरु होती. चर्चेवेळी या दोघांमध्ये आवाज वाढल्याने लॉबीबाहेर असलेल्या लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरला. परंतु आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादाजी भूसे यांच्यात कोणतीही झटापट किंवा अंगावर जाण्याचे प्रकार घडले नसल्याचे सांगितले.

मात्र लॉबीत घडलेल्या प्रकाराबद्दलचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करत महेंद्र थोरवे आणि दादाजी भुसे यांच्यातील धक्काबुकीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. त्याचबरोबर सभागृहाबाहेर पर्यंत जर गँगवॉर आले असेल तर ते गंभीर आहे. त्यामुळे याप्रकरणाची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी केली. त्याचबरोबर भाजपाचे राम कदम आणि आशिष शेलार यांनी जो व्हिडिओ दाखवत योगेश सावंत यांचे नाव घेतले. मुळात त्या व्हिडिओतील तो व्यक्ती योगेश सावंत नसल्याचे स्पष्ट झाल्याने रेकॉर्डवर आलेली माहिती चुकीची असल्याने ती पटलावरून काढून टाकावी अशी मागणी केली.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *