Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा, मी मुलाखत देईन तेव्हा देशात भूकंप होईल योग्य वेळी बोलेन, आरोप-प्रत्यारोपाची माझी सवय नाही

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत नेत राज्यात सत्ता स्थापन केली. या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये उघड दोन गट पडले आहेत. त्यातच उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेवर यापूर्वी चुप्पी साधणाऱ्या शिंदे गटाकडून आता ठाकरे कुटुंबियांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांनाच थेट इशारा देत मी जेव्हा मुलाखत देईन तेव्हा राज्यात नव्हे तर देशात भूकंप होईल असा गर्भित इशारा दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मालेगांवच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शासकिय कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर जाहिर सभेत ते बोलत होते.

सध्या मुलाखती दिल्या जात आहेत. पण मी जेव्हा मुलाखत देईन तेव्हा राज्यात आणि देशात भूकंप होईल असा इशारा उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता देत शिंदे म्हणाले दिघेंसोबत काय झाले ते योग्य वेळी नक्की सांगेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत खूप काही झालं. सिनेमा हे फक्त उदाहरण आहे. दिघे यांच्या जीवनामध्येही ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. मी योग्य वेळी नक्की बोलेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण योग्य वेळी बोलेन. सध्या मुलाखतींचा सपाटा सुरु आहे. पण मी जेव्हा मुलाखत देईन तेव्हा राज्यात नव्हे तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. आरोप प्रत्यारोप करणे माझ्या स्वभावात नाही. आपण भाजपासोबत निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला कौल दिला. जनमत दिले. भाजपासोबत आपण सत्ता स्थापन करण्याऐवजी आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रिपद मिळवले. गद्दारी तुम्ही केली की आम्ही केली, असा सवालही त्यांनी उध्दव ठाकरे यांना केला.

आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली आहे. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. वयाच्या १६ व्या वर्षापासून आम्ही शिवसेना वाढीसाठी मेहनत करतो आहे. तुम्ही आमचे आईबाप काढता. आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो, कधी आमच्या मुलाबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही वर्षातून दोन दोन, तीन तीन वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके शिवसेना करत राहिलो असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

आम्ही कधी वेळ-काळ बघितला नाही, दिवस-रात्र बघितली नाही. शिवसेना अशीच मोठी झाली आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांमधून शिवसेना मोठी झाली. वेगवेगळ्या विभागात दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यासारख्या आमच्या नेत्यांच्या मेहनतीमुळे शिवसेना मोठी झाली. आरोप-प्रत्यारोप करणं माझा स्वभाव नाही. परंतु आम्ही गद्दारी केली, विश्वासघात केला, असे आरोप झाल्याचे ते म्हणाले. भाजपा-शिवसेना युतीने निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला कौल दिला. त्या लोकांसोबत सत्तास्थापन करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का? विश्वासघात आम्ही केला का? हा विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला थारा दिला नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी जवळ केलं. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केलं, मग विश्वासघात कुणी केला? तुम्ही केला की आम्ही? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही त्या बाळासाहेबांच्या भूमिकेशी प्रतारणा, विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सावरकरां विषयी अपमानजनक शब्द काढणाऱ्या काँग्रेसच्या लोकांविरुद्ध आम्हाला बोलता येत नव्हतं. तोंडाला पट्टी लावून बसावं लागत होतं. मग विश्वासघात आम्ही केला की आणखी कुणी केला असेही ते म्हणाले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *