Breaking News

अमित शाह यांचे मुख्यमंत्री ठाकरेंसह महाविकास आघाडीला आव्हान, “मैदानात या” भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आघाडी सरकार हे पंक्चर झालेले सरकार असल्याची टीका

मराठी ई-बातम्या टीम

पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरु केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली. काँग्रेसने त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सफरचा बिझनेस म्हणतात. मग महाराष्ट्राला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हवं की डिलर, ब्रोकर आणि ट्रानस्फरमध्ये कटमनी घेणारं सरकार हवं? असा सवाल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डायरेक्ट ट्रान्सफर मनी या योजनेचा महाविकास आघाडीने वेगळाच अर्थ काढल्याचे सांगत राजीनामा द्या आणि मैदानात या आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार असल्याचे आव्हानही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला त्यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांची तब्येत ठिक नाही. पण जेव्हा ठिक होती तेव्हा तरी कुठं बोलले. मी प्रार्थना करतो की त्यांची तब्येत ठिक व्हावी. महाराष्ट्रातील सरकार कुठे आहे? लोक शोधत आहेत अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली.

काल अहमदनगर येथील पहिली सहकार परिषद पार पडल्यानंतर आज पुणे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पुणे येथील आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

देशात इंधर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेत त्यावरील टॅक्स कमी केला. त्यावेळी मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना राज्य सरकारांनीही आपला कर कमी करण्याचं आवाहन केलं. भाजपशासित राज्यांनीही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केला. पण यांना काही वेगळंच ऐकायला आले, यांनी इंधन नाही तर दारू स्वस्त केली. अरे भाई, दारू स्वस्त करायची नव्हती, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचं होतं, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

तसेच आता उद्धव ठाकरे सरकारला विचारायला हवं की देशात पेट्रोल-डिझेल १५ रुपयांनी स्वस्त झालं, महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रातील जनतेला दारु नाही तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त हवं आहे असेही ते म्हणाले.

राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची ऑटो रिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर असून हे सरकार हलतही नाही आणि चालतही नाही. फक्त धूर सोडून प्रदुषण करतय या शब्दात त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उठविली.

पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असे म्हणत असल्याची टीका करत हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला दिले.

या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालाने झाली पाहिजे, असे सांगत पुणे महापालिकेत लक्ष्य कमी ठेवू नका. कोणी म्हणतं शंभर जागा जिंकू तर कोणी म्हणतं ११० जागा जिंकू. तुम्ही लक्ष्य कमी ठेवू नका. जनता खूप द्यायला तयार आहे. तुम्ही मागताना कंजुषी करू नका, अशी आदेशही त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले.

Check Also

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *