Breaking News

क्षुल्लक घटना आहे म्हणणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री आता म्हणतात… आदर राखला गेला पाहिजे माझे नागरीकांना आवाहन आहे

मराठी ई-बातम्या टीम

शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली. त्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारणा केली असता त्यांनी ही क्षुल्लक घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतले गेले. त्यामुळे या प्रकाराच्या निषेधार्थ बेळगावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले. कर्नाटक पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली असून तेथे तणावाचे वातावरण आहे.

यापार्श्वभूमीवर शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुतळा विटंबनेप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष घालण्याची मागणी करत दुटप्पी भूमिका सोडण्याचे आवाहन केले. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी लोकांना प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा आदर करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

मी लोकांना देशभक्तांचा आदर करण्याचे आवाहन करतो. या लोकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले होते. आदराचे प्रतीक म्हणून कित्तूर राणी चेन्नम्मा, सांगोली रायण्णा आणि शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले गेले आहेत. आपण त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचा सन्मान राखला पाहिजे असेही ते म्हणाले.

भाषेच्या राजकारणाच्या नावाखाली आमच्या कोणत्याही महान राष्ट्रीय नेत्याचा अपमान करणे हे त्यांच्या राष्ट्रीय भावनेचा अपमान आहे आणि ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा देत आम्ही कोणत्याही परिस्थितीत संशयितांना कर्नाटकातील कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही. आमचे सरकार देशभक्तांचा अपमान करणारे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे कोणतेही कृत्य खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

बंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. ही बातमी पसरताच दक्षिण बेळगावी येथील अनगोळ येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देणारे रायण्णा यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. त्यामुळे शनिवारी महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बेळगावी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी काल पहाटेपासूनच आंदोलकांची धरपकड सुरू केली. युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह २७ जणांना अटक करण्यात आली. जामीन मिळू नये यासाठी १४ प्रकारची कलमे त्यांच्याविरोधात लावण्यात आली. न्यायालयासमोर उभे केले असता काल सायंकाळी २७ जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याचबरोबर पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख नेते माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह ३४ जणांना अटक केली.

Check Also

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *