Breaking News

मंत्रिमंडळ विस्ताराच्या वृत्तामुळे युतीतील आमदारांची चुळबुळ वाढली शिवसेनेच्या अल्पसंतुष्ट आमदारांवर भाजपची नजर

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील भाजप शिवसेनेच्या सरकारला येत्या ३१ ऑक्टोंबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. तर त्यातच नोव्हेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने नेहमीप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराचे वेधही लागले आहेत. किमान या राहिलेल्या १ वर्षाच्या कालावधीत तरी राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागांवर आपली वर्णी लागावी म्हणून भाजप आणि शिवसेनेतील इच्छुक आमदारांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरु केले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना खुष करण्यासाठी आमदारांमध्ये चुळबुळ वाढल्याचे चित्र सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये वाढल्याचे दिसत आहे.
सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेच्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून भाजपमधील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकिय निवासस्थानी चकरा वाढल्या आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या संभावित मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी सातत्याने सेनेच्या आमदार-खासदारांच्या बैठका घेत आहेत. या बैठकांमध्येही कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, परभणी जिल्ह्यातील आमदारांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्याकडे आग्रह करत आहेत. परंतु राजकियदृष्ट्या मंत्रिमंडळात सहभागी होणे शिवसेनेला आगामी निवडणूकीच्यादृष्टीने अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
तर दुसऱ्याबाजूला भाजपकडून शिवसेनेतील मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना आगामी निवडणूकीच्यादृष्टीने गळाला लावण्यासाठी त्यांच्यावर नजर ठेवण्याचे काम सुरु केले आहे. तसेच ऐनवेळी निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेचे शिवबंधन तोडून भाजपचे कमळ हाती घेण्यास इच्छुक असलेल्यांशी बोलणी करण्याचे काम भाजपकडून सुरु आहे. त्यामुळे भाजपची विधानसभेतील सदस्य संख्या वाढून शिवसेनेचे मतदारसंघही काबीज करण्याची रणनीती भाजपमधून आखण्यात येत आहे.
परंतु दरवेळी विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि नंतर प्रत्येकवेळी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वृत्त येण्यास सुरुवात होते. परंतु प्रत्यक्षात होत काहीच नाही. मात्र या प्रकारच्या वृत्तांमुळे सत्ताधारी पक्षातील आमदारांची चांगलीच घालमेल होत पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिझवावे लागत असल्याची खंत भाजपमधील एका ज्येष्ठ आमदारांने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *