Breaking News

आणि भाजप आमदारांच्या आक्रमणाला आरोग्यमंत्र्यांकडून मोदींच्या नावाचे उत्तर क्षयरोगाच्या संशोधनासाठी जे.जे.रूग्णालयात केंद्र सुरु करण्याची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईसह राज्यात क्षयरोगग्रस्तांची संख्या वाढत असून या रोगावरील उपचार सेवेवरून भाजप आमदार पराग अळवणी, अतुल भातखळकर यांनी चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी भाजप आमदारांच्या विरोधाची धार बोथट करून टाकल्याचे दृष्य विधानसभेत पाह्यला मिळाले. मात्र क्षयरोगासंदर्भात अधिकचे संशोधन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरु करणार असल्याची घोषणा करत या रोगाची तपासणी करण्यासाठी मुंबईत पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत त्यापैकी तीन प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुंबईसह राज्यात गतवर्षी दोन लाख नव्या क्षयरोग रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच या रोगावरील उपचाराच्या अपुऱ्या सुविधा असल्याबाबतचा मुद्दा भाजपचे आमदार पराग आळवणी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला.

या लक्षवेधीवर उपप्रश्न भाजपचेच आमदार अतुल भातखळकर यांनी विचारत मुंबईतील शिवडी येथील क्षयरोद केंद्रात वर्षभर औषधे नसल्याचा मुद्दा उपस्थित करत मुंबईतीलच एकूण २४ केंद्रांपैकी किती केंद्रे चांगल्या अवस्थेत आहेत? असा प्रश्न करत आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की,  राज्यात एकूण नोंदविलेल्या क्षयरुग्णांपैकी साधारणाता १८ ते २० टक्के रुग्ण मुंबईत आढळून येतात. क्षयरोगाच्या संनियंत्रणासाठी मुंबई शहरात स्वतंत्र २४ जिल्हा क्षयरोग केंद्र आहेत. राज्यात ५१७ क्षयरोग उपचार पथके असून मुंबईत ५९ पथक कार्यरत आहेत. संशयित रुग्णांच्या थुंकी नमुना तपासणी राज्यभरात  १५२० सुक्ष्मदर्शी केंद्र असून त्यातील १३० केंद्र मुंबईत आहेत.

नियमित औषधोपचारास जे रुग्ण दाद देत नाहीत अशा एमडीआर, एक्सडीआर बाधीत रुग्णांची प्रयोगशाळा तपासणीसाठी  राज्यात १२ कल्चर ॲण्ड डीएसटी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी मुंबईत पाच ठिकाणी या प्रयोगशाळा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जे. जे. रुग्णालय, हिंदुजा हॉस्पीटल, जीटीबी हॉस्पीटल, मेट्रोपॉलीस हेल्थकेअर लॅबोरेटरी व एसआरएल येथे प्रयोगशाळा मंजूर झाल्या आहेत त्यातील जे.जे. आणि हिंदुजा येथील प्रयोगशाळा कार्यरत असून सहा महिन्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याची  घोषणा केली  आहे. त्यासाठी चारसुत्री पद्धतीने कार्यक्रम राबविला जात असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.

 

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *