Breaking News

अहमदनगराच्या नामांतराची तयारी सरकारकडून सुरू, आता जिल्हा विभाजनाचीही मागणी बाहेरच्या व्यक्तीच्या मागणीवरून नामांतर नको तर स्थानिकांच्या मागणीवरून करा

अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर असे करावे, ही मागणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यानुसार राज्य सरकारने महापालिकेकडून ठराव मागविला असतानाच आता नामांतरासोबतच जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे आला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी परस्पर विरोधी मते व्यक्त केली.
आमदार पडळकर यांच्या मागणीवरून राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असल्याची माहितीही सरकारतर्फे अधिवेशनात देण्यात आली.

सरकारने नोव्हेंबर महिन्यातच महापालिकेला पत्र पाठवून नामांतराचा ठराव करून पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, जिल्ह्याचे नामांतर करणे ही गोष्ट महापालिकेत्या अख्यातरित कशी येते, यासंबंधी प्रशासनात संभ्रम असून असे असेल तरी आगामी महासभेत हा विषय मांडण्याची प्रशासनाची तयारी आहे.

अहमदनगरच्या नामांतराची मागणी जुनीच आहे. विशेष म्हणजे अनेक पक्ष आणि संघटनांकडून यासाठी वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. अंबिकानगर हे सर्वात आधी सूचविलेले नाव आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही एका सभेत ही घोषणा केली होती. आता मनसेचाही त्या नावाला पाठिंबा आहे. त्यानंतर आनंदनगर हे नावही जैन समाजाकडून पुढे करण्यात आले. गेल्यावर्षी आमदार पडळकर यांनी अहिल्यादेवीनगर हे नाव लावून धरले. अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यात असल्याने त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

यावर सरकारने हालचाली सुरू केल्या असल्या तरी असा बाहेरच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून होणारा निर्णय स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनाही मान्य नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो स्थानिकांना विश्वासात घेऊनच व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही हीच भूमिका मांडली आहे. नामांतराला आमचा विरोध नाही, मात्र जो काही निर्णय घ्यायचा तो स्थानिकांनी घ्यावा, अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
यासोबतच जिल्हा विभाजनाचा जुना मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील निवडणुकीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या विखे पाटील यांचा याला विरोध होता. मुख्य म्हणजे आता भाजपामध्ये जाऊन खासदार झाल्यानंतरही त्यांचा विरोध कायम आहे. ते म्हणाले, आता राष्ट्रवादीचे शहराचे आमदार जिल्हा विभाजनाची मागणी करीत आहेत. पूर्वी त्यांचे सरकार होते, त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री आणि जिल्ह्यातीलच महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही. जिल्हा विभाजन करण्यास माझा वैयक्तिक विरोधच आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

तर, आमदार जगताप यांनी नामांतराला आपला विरोध नाही. तो निर्णय स्थानिक पातळीवर व्हावा, मात्र त्यासोबतच जिल्ह्याचे विभाजन व्हावे. त्यामुळे नगर शहरासह दक्षिण भागाचा विकास होईल, असे मत जगताप यांनी मांडले.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला,… भाजपाची अवस्था विचित्र झालीय

लहान असताना राम राम म्हणटलं की भूत पळू जायची असे मी ऐकत होतो. पण ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *