Breaking News

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निकालावर शरद पवार म्हणाले, मोठा वर्ग बाहेर फेकला… स्वागत आणि सत्कारासाठी दौरे निघालेले नाहीत...

राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नुकतेच दिले. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणार असल्याचे स्पष्ट झाले. यापार्श्वभूवीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, या निर्णयामुळे मोठा वर्ग सत्तेच्या, प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल, याची मला चिंता वाटत असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे ही उपस्थित होते.

वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती आल्याशिवाय त्याबाबत बोलणे योग्य होमार नाही. पण सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. हा मोठा वर्ग सत्तेच्या, प्रशासनाच्या, संसाधनाच्या बाहेर फेकला जाईल की काय? अशी चिंता मला वाटत असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. या निवडणुका लांबणीवर टाकून नव्याने कार्यक्रम जाहीर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळला.

दरम्यान, राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.

राज्यात सध्या एकनाथ शिंदे-भाजपा यांचे संयुक्त सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून सत्ताशकट हाकत आहेत. राज्यात शिंदे सरकारची स्थापना होऊन साधारण एक महिना उलटला असून अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याच कारणामुळे हे सरकार लवकरच पडेल. लवकरच निवडणुका लागतील असा दावा विरोधकांकडून केला जातोय. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार कधी पडेल याबाबत मला माहिती नाही. मी ज्योतिषी नाही. पण निवडणुका लागल्या तर आमची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

सरकार कधी पडेल याबाबत मला काही माहिती नाही. मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे मी यावर काही भाष्य करणार नाही. पुढे निवडणुका आल्या तर आम्ही तयार आहोत. निवडणुका येणार नसतील तर सध्या राज्य सरकार कोणत्या पद्धतीने चालवलं जातंय यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जिथे कमतरता आणि चुका असतील त्या समजण्याची भूमिका आमची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आपल्या दौऱ्यात वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. यावर देखील शरद पवार यांनी भाष्य करताना म्हणाले, मुख्यमंत्री दौऱ्यावर निघतात ही चांगली गोष्ट आहे. मात्र कोणत्या भागाला भेट द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी लोक संकटात आहेत. जेथे अतिवृष्टी झालेली आहे अशाच ठिकाणी विरोधी पक्षाने दौरा केला. मात्र स्वागत आणि सत्कारासाठी विरोधी पक्षाचे दौरे निघालेले दिसत नाहीत असा खोचक टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

Check Also

शरद पवार यांचा हल्लाबोल, एखाद्या हुकूमशहासारखं मोदींचा राज्यकारभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *