Breaking News

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समुदायाकडून निदर्शने दिल्लीत जामा मस्जिदसह सोलापूर, औरंगाबादेत निदर्शने केली

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा हीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचे पडसाद देशासह महाराष्ट्रातील काही भागात उमटले. दिल्ली, सोलापूर, औरंगाबादेत निषेधाचे मोर्चे निघाले. तसेच नुपूर शर्मा हीच्या अटकेची मागणी करण्यात आली.

दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात पोस्टर्स घेत नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम नागरिक मोठ्या प्रमाणात जामा मशिदीबाहेर जमा झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. काही वेळानंतर यातील काही आंदोलक निघून गेले, मात्र काही अद्यापही आंदोलन करत आहेत. दिल्लीनंतर मुस्लीम समुदायाच्या आंदोलनाची धग देशभरातील अनेक शहरापर्यंत पोहोचली आहे. लखनऊ, कानपूर आणि फिरोजाबाद सारख्या शहरांत देखील मुस्लीम समुदायाकडून मोर्चे काढले आहेत. यानंतर पोलिसांनी संबंधित शहरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

दिल्लीतील जामा मशिदी बाहेरच्या निदर्शनानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपूर, मुरादाबाद आणि प्रयागराजच्या रस्त्यावर शेकडो मुस्लिमांनी मोर्चा काढत दुकानं बंद करण्यास लावलं आहे. तर प्रयागराजमधील एका भागात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचीही माहिती मिळत आहे. मागील काही तासांपासून येथील परिस्थिती अस्थिर आहे. प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दंगल उसळली होती. यामध्ये जवळपास ४० लोक जखमी झाले होते.

महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूरात देखील मुस्लीम समुदायाने एकत्र येत निदर्शने केली आहेत. औरंगाबादमधील विभागीय कार्यालयासमोर मुस्लीम बांधव हजारोंच्या संख्येनं जमले आहेत. येथे त्यांनी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध केला. तर सोलापुरात देखील एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून एमआयएमचे शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळाले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *