Breaking News

वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पाठविल्या “या” खास वस्तू तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट आणि निधी भेट म्हणून पाठविल्या-रूपाली ठोंबरे-पाटील

राज्यात एकाबाजूला राज्यसभा निवडणूकीची गरमागरमी सुरु झालेली असून सहाव्या जागेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे होत असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये वेगळाच कलगीतुरा रंगताना दिसू लागले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोचक शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी

काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना तेलाची बाटली, साबण, ब्रश आणि गोळा केलेला निधी कुरिअरने पाठवला आहे. तसेच, यासंदर्भात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना खोचक टोलाही लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा यावेळी रूपाली पाटील यांनी उल्लेख केला. राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी केले होते. मात्र कोल्हापूर येथील पोटनिवडणूक चंद्रकांत पाटील लढले नाहीत. पण तिथे भाजपाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते. मात्र ते काही गेले नाहीत नसल्याचे त्या म्हणाल्या.

चंद्रकांत पाटील यांनी राजकीय संस्कृती संपवण्याचं काम केल्याची टीका रुपाली पाटील यांनी करत चंद्रकांत पाटील यांनी चुलीत जा, मसणात जा, अशा पद्धतीचे विधान केले. त्यामुळे त्यांनी राजकीय संस्कृती संपविण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी हिमालयात जाण्यासाठी गोळा केलेला निधी आणि तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट कुरिअरने पाठवत आहोत असेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटलांनी हिमालयात गेल्यावर डोक्याला तेल लावावे आणि ध्यान करावे. यामुळे त्यांच्या मनाला आणि डोक्याला निश्चित शांती मिळेल. तसेच त्यांच्या संस्कारामध्ये देखील वाढ होईल. त्यामुळे दिलेला शब्द चंद्रकांत पाटील यांनी पाळला पाहिजे आणि हिमालयात जायला पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अशा पध्दतीच्या भेटवस्तू पाठवून एकप्रकारे पाटील यांना डिवचले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपाकडून याची परतफेड कशी करणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *