Breaking News

ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर पटोले म्हणाले, लढाई अंहकाराने नाही तर… काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्यायः नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महत्वकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई दौ-यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपाच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुलजी मोदी सरकारविरोधात लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय असल्याचे ते म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सततच्या परदेशी दौऱ्यावरून टीका करत सतत परदेशी राहीलात तर राजकारण कसे करणार असा खोचक सवालही त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वरील वक्तव्य केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *