Breaking News

मुंबई विद्यापीठात National Education Policy ची राष्ट्रीय कार्यशाळा

राज्यात National Education Policy अर्थात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत अधिक स्पष्टता यावी, यासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत तसेच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री, नीती आयोग, यूजीसी, नॅक यांच्याशी समन्वय करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण विभागानी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.

आज मंत्रालयात नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित राष्ट्रीय परिषदेविषयी पूर्वतयारीच्या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) संचालक निपुण विनायक, उपसचिव अशोक मांडे , मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू अजय भामरे, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर आदी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्यासह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत National Education Policy विविध उपक्रम व नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत असताना अधिक स्पष्टता यावी आणि अधिक माहिती व्हावी, यासाठी नीती आयोगाकडे विभागाने कार्यगट निर्माण करून पाठपुरावा करावा. सध्या राज्यात २०० महाविद्यालयामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) सुरू असून त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक धोरणाचे ब्रॅंडिंग होण्यासाठी मुंबईत परिषद आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध परिसंवादाचे आयोजन, विविध सत्रात राज्यातील शिक्षणाविषयाची माहिती, योजना, उपक्रम, विविध विद्यापीठात प्रशिक्षण, अभ्याससत्राच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात यावे. जेणेकरून राज्यातील उच्च शिक्षण विभागाची सकारात्मक प्रतिमा देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. इतर शासकीय आणि खाजगी नामांकित विद्यापिठांनी विविध विषयावर दिवसभर कार्यशाळा आयोजित करावी. यात देशभरातील किमान १० राज्यांतील विद्यापीठांना निमंत्रित करावे. या सर्व विषयांचे पुस्तक काढता येईल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागात सोशल मीडियाचा वापर वाढवा

महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण व धोरणात्मक सुधारणांची माहिती देशभरातील विद्यार्थी, विद्यापीठ यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम आहे. यामुळे विभागाने वेबपोर्टल तत्काळ अपडेट करून त्यामध्ये बदल करावेत. राज्यभरातील विद्यापीठे, विविध प्रशिक्षणे, अभ्यासक्रम, योजना, उपक्रम, प्रयोग याची एकत्रित सारांश रूपातील माहिती विद्यापीठनिहाय घेता येईल. मराठीसोबत हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ भाषातही सारांश तयार करावेत. जेणेकरून देशभरातील सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यापिठांशी जोडले जातील. शिवाय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे एक्स हॅन्डल तयार करून यावरही माहितीपूर्ण मजकूर वेळोवेळी अपडेट करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. फ्लेम विद्यापिठाचे प्रा. युगांक गोयल यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सादरीकरण केले.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *