Breaking News

अन्यथा झोपडपट्टीधारक विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार मुंबई आणि ठाणे झोपडीधारकांमध्ये भेदभाव करत असल्याचा संघटनेचा आरोप

ठाणेः प्रतिनिधी
येत्या ४८ तासात ठाण्यातील 210 झोपडपट्टीतील रहिवाशांना मुबंईप्रमाणे ३०० स्क्वेअर फुटांचे घर दिले नाही तर येणाऱ्या सोमवारी झोपडपट्टीवासीयांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा काढूनही मागणी मान्य न झाल्यास आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ठाणे शहर झोपडपट्टी रहिवासी संघटनेने एका पत्रकार परिषदेत दिला आहे.
२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार ठाण्यात असणाऱ्या शासकीय, निमसरकारी आणि खाजगी जागांवर सुमारे २१० झोपडपट्ट्यामध्ये नऊ लाखांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. पण शासन मात्र मुंबईकरांसाठी वेगळा आणि ठाणेकरसाठी वेगळा निकष लावून भेदभाव करत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष राकेश मोदी यांनी केला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबईत यापूर्वी २६९ स्क्वेअर फुटांचे घर दिले जात होते. पण गतवर्षी मे महिन्यात झालेल्या बैठकीत मुंबईतील झोडपट्टीधारकाना ३०० फुटांचे घर देण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्याचवेळी ठाणे आणि इतरत्र २६९ फुटांचे घर देण्याच्या निर्णयात काहीच बदल केला नाही. त्यामुळे राज्यकर्ते ठाण्यातील झोडपट्टीधारकाना सापत्न वागणूक देत असल्याची टिका त्यांनी केली.
पत्रकार परिषदेला ठाणे शहर झोपडपट्टी रहिवाशी संघटनेचे अध्यक्ष राकेश मोदी, आनंद कांबळे, महादेव पवार, विजयप्रताप सिंह, इमॅन्युअल नाडार, प्रमोद पांडे, सुरेश खेराडे, सितारम नायडू, बाबा राऊत, उमा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
एसआरए योजनेसाठी मुंबईला मिळणारा एफएसआय व मुंबईला लागून असलेल्या ठाण्याला मिळणारा एफएसआय यामध्ये ३१ स्क्वे.फुटाचा फरक, एखादा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना मुंबईला 51 टक्के झोपडपट्टीधारकांची सहमती व तोच प्रकल्प ठाण्यामध्ये राबवायचा झाल्यास त्याकरीता ७० टक्के झोपडीधारकांची संमती, मुंबईसाठी चटईक्षेत्र निर्देशांक ४ तर ठाण्यासाठी ३ चटईक्षेत्र आहे. योजना एकच आणि प्राधिकारण पण एकच मात्र निकष वेगवेगळे कसे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबईला लागू असलेले नियम ठाण्यासाठी लागू करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास या झोपडपट्ट्यांमधील २५ हजार नागरिकांचा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *