Breaking News

मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व भारतीय धावपटूंमध्ये गोपी थोनकल, सुधा सिंग ठरली सरस

मुंबई : प्रतिनिधी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतील रहिवासी रविवारी सकाळी भल्या पहाटेच रस्त्यावर उतरले. निमित्त होते टाटा मुंबई मॅरेथॉनचे. लोकांनी केलेली गर्दीच स्पर्धा किती यशस्वी झाली आहे हे सांगत होती. देश परदेशातल्या आघाडीच्या धावपटूंसोबत मुंबईकरही धावले. पण यासर्वांमध्ये इथोपियांच्या धावपटूंनी मुख्य मॅरेथॉनमधील अव्वल स्थानावर आपला हक्क सांगितला. इथोपियाचा दिर्घ पल्ल्याचा धावपटू सॉलोमन डेकिसा पुरुषांमध्ये  तर अमाने गोबाने महिला गटात विजयी  ठरली. भारतीय धावपटूंमध्ये गोपी थोनाकल आणि सुधा सिंग अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल ठरले.

२ तास ९ मिनीटे ३४ सेकंदात पूर्ण केली शर्यत

इथोपियाच्या २२ वर्षीय सॉलोमनने डेकिसाने २ तास ९ मिनीटे ३४ सेकंद अशा वेळेत ४२ किलोमीटर अंतराची पुर्ण मॅरेथॉन जिंकली. दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानासाठी या गटात चांगली चुरस पहायला मिळाली. डेव्हिसचा संघ सहकारी २९ वर्षीय सुमेत अकालनावने  अवघ्या ३० सेकंदाच्या फरकाने केनियाच्या जोशुआ किपकोरिरला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. सुमेतने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी २ तास १० मिनीटे एवढा वेळ घेतला तर जोशुआने तिसरे स्थान संपादन करताना २ तास १० मिनीटे आणि ३० सेकंद अशी वेळ नोंदवली. शर्यत जिंकल्यानंतर डेकिसा म्हणाला की, शर्यत जिंकणार असा विश्वास होताच. मुंबई मॅरेथॉनमधील हे पहिले यश आहे. त्यामुळे पुढील स्पर्धा जिंकण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल.

महिलाही ठरल्या वेगवान

महिला गटात अमानेने २ तास २४ मिनीटे आणि ४९ सेकंद अशा कामगिरीसह केनियाच्या बॉर्नेस किटुरला (२ तास २८ मिनीटे ४८ सेकंद) मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. अमानेची संघ सहकारी शुको गेनोमो (२ तास २९ मिनीटे आणि ४१ सेकंद) तिसर्‍या क्रमांकाची मानकरी ठरली. भारतीय धावपटूंमध्ये पुरुष गटात अव्वल स्थान मिळवणार्‍या गोपीने २ तास १६ मिनिटे आणि ५२ सेकंदात ही मॅरेथॉन पुर्ण केली. त्यात नितेंद्रसिंग रावत (२ तास १६ मिनीटे ५४ सेकंद) आणि श्रीनु बुगाता (२ तास २३ मिनिटे ५६ सेकंद) अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानी राहीले.

सुधाने वेदनांना मागे टाकले

पायांचे स्नायू दुखावल्यामुळे होणाऱ्या वेदनांना मागे टाकत सुधा सिंगने भारतीय महिला धावपटूंमध्ये २ तास ४८ मिनीटे ३२ सेकंद अशा वेळेसह बाजी मारली. ज्योती गवतेने (२ तास ५० मिनीटे ४७ सेकंद) दुसरा आणि पारुल चौधरीने (२ तास ५३ मिनीटे २६ सेकंद) तिसरा क्रमांक मिळवला.

मुंबई मॅरेथॉनमध्ये ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’

राज्याच्या परिवहन, आरटीओ, एसटी विभागातील अधिकारी, कर्मचार्यांसह ध्वनी प्रदूषणमुक्तीसाठी काम करणाऱ्या सुमारे ३०० स्वयंसेवकांनी आज मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नारा दिला. ‘ध्वनी प्रदूषण टाळा, आरोग्य राखा’चा संदेश देत यातील काही जण हाफ मॅरेथॉनमध्ये तर काही जण ड्रीम रनमध्ये सहभागी झाले. ‘No Honking’चा संदेश देणारे पिवळे टी शर्ट आणि टोपी परिधान करून सहभागी झालेले हे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधत होते. काही जणांनी पिवळा टी शर्ट आणि धोतर परिधान करून हॉर्न न वाजविण्याचा संदेश दिला. या मोहिमेत परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागातील सचिव, उपसचिव, आयएएस असोसिएशन, मुंबई आरटीओ, एसटी मुख्यालय आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *