Breaking News

सुनिल तटकरे यांचे आवाहन, मराठा समाजातील तरुणांनो…सहकार्य करा राज्य सरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे

सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले. त्यावेळी कुठे गालबोट लागले नाही मात्र आज जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. सरकारने आरक्षण मिळावे यासाठी पाऊले टाकली आहेत, आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनो राज्य सरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे त्यासाठी सहकार्य करा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे बुधवारी सायंकाळी प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले असता त्यावर सुनिल तटकरे यांनी उत्तरे दिली.

सुनिल तटकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरक्षण दिले गेले ते उच्च न्यायालयात टिकले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही दिले गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयात काही कायदेशीर बाबी नमूद करून आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. आताही आमची आरक्षण मिळावे हीच भूमिका आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही एका झालेल्या बैठकीत आरक्षण दिले पाहिजे त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे अशी भूमिकाही मांडण्यात आली होती आणि यावर एकमतही झाले होते. कायद्याच्या कसोटीत आरक्षण टिकले पाहिजे असे मराठा नेतृत्वांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकत शिंदे समिती स्थापन करून ही समिती राज्यव्यापी दौरा करत आहे. आरक्षण देण्याबाबत महायुतीतील पक्ष सकारात्मक आहेत असेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे. पोलीस तपास सुरू आहे. आरोप – प्रत्यारोप होत राहतील परंतु सरकारने या सर्व प्रकरणाची खोलवर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, कदाचित उध्दव ठाकरे यांच्या पक्षात झालेल्या बंडाचे शल्य त्यांच्या मनात असावे. नाराजी असू शकते. त्यामुळे अजित पवार यांचा मंत्रिमंडळातील सहभाग हा एकटयापूरता सीमित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून घेतलेला तो निर्णय आहे. एनडीएमध्ये सहभागी होत असताना अत्यंत विचारपूर्वक उद्याच्या भवितव्याची पाऊले उचलण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय घेतला गेला. त्यामुळे टिका करण्याचा अधिकार उध्दव ठाकरे यांना आहे तो ते करत राहतील असे मत व्यक्त केले.

संजय राऊत हे अलीकडे दिवसभर पत्रकार परिषदेत काय काय बोलतात याची कल्पना नाही. परंतु सरकारपासून जपून रहा म्हणजे त्यांना काय सूचित करायचे आहे हे त्यांनाच तुम्ही विचारा असा प्रतिप्रश्न सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *