Breaking News

सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळः ईद ए मिलाद सणाची गुरूवारची सुट्टी शुक्रवारी सलग पाच दिवस सुट्टी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार २८ तारखेला आले आहेत. त्यामुळे गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस सरकारी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र सामाजिक सलोखा राखण्याच्या नादात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी मिळाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ झाली आहे.

नियमानुसार राज्य सरकारकडून अनंत चतुर्दशी दिवशी सुट्टी जाहिर करण्यात येते. मात्र नेमक्या याच दिवशी ईद ए-मिलाद या सणही आला. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायाचे सण एकाच दिवशी आले. त्यामुळे गुरुवारी अंनत चतुर्दशी दिवशी आलेल्या ईद ए मिलादची सुट्टी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रोजी राज्य सरकारने जाहिर केली. शुक्रवारनंतर शनिवार, रविवार हे दोन दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार दिवस सुट्टी मिळाली. तसेच २ ऑक्टोंबर सोमवारी या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असल्याने या दिवसाची सुट्टीही केंद्र सरकारने यापूर्वीच जाहिर केली.  त्यामुळे गुरूवारची सुट्टी घेऊन पुन्हा शुक्रवारी पुन्हा कामावर हजर राहणाऱ्या शासकिय कर्मचाऱ्यांना अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे शुक्रवारी कामावर हजर राहणे अनेक कर्मचाऱ्यांना अडचणीचे भासते. या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी-कर्मचारी शुक्रवारची सुट्टी टाकून पाच दिवस सुट्टी एन्जॉय करता येणार आहे. राज्य सरकारनेच शुक्रवारची सुट्टी जाहिर केल्याने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवसांची सुट्टी एन्जॉय करता येणार आहे.

त्यातच ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.

अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.

गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तसेच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा,अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *