Breaking News

सचिन तेंडुलकर याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत - एकनाथ शिंदे

सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने तेंडुलकर यांचा हा २२ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. ढोल ताशांच्या गजरात या पुतळ्याचे दिमाखात अनावरण झाले.

या सोहळ्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआयचे खजिनदार आमदार ॲड. आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अजिंक्य नाईक, सहसचिव दीपक पाटील, खजिनदार अरमान मलिक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आदी तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक ‘मास्टर ब्लास्टर’ क्षण आहे. आज या मैदानावर दोन – दोन ‘मास्टर ब्लास्टर’ आहेत.एक मूर्तीमंत..आणि एक मूर्तीबद्ध. सचिन हा क्रिकेटचा देव आहे. सचिनने आपलं करिअर याच मैदानातून सुरु केले आणि याच मैदानात कारकीर्दीमधील अखेरच्या बॉलचा सामना केला. भारत विश्र्वचषकाचा विजेता बनावा हे सचिनचे स्वप्न याच स्टेडियमवर पूर्ण झाले आहे. क्रिकेट विश्वात दुसरा सचिन होणे नाही. पण, मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी तो चमत्कार करून दाखवला आहे. सचिन तेंडुलकर या नावात स्फूर्ती आहे. संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे सचिन प्रतिक आहेत. हा पुतळा तरुणांना आपले ध्येय गाठण्यासाठी मोठी ऊर्जा देणारा आणि क्रिकेटपटूसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल. सचिन हा भारताने जगाला बहाल केलेला चमत्कार आहे. इतर देशांकडे क्रीडा क्षेत्रातील आश्चर्य, विक्रम असतील. पण सचिन हेच एक मुर्तीमंत आश्चर्य आपल्याकडे आहे. तो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. याचाही सार्थ अभिमानही आपल्याला आहे. त्यांचा हा पुतळा वानखेडे स्टेडियमच्या वैभवात, गौरवात भर घालणारा आहे, असेही सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सचिन यांच्या बॅट मधून होणारा चौकार, षटकार अनुभवले की आपली दिवसभराची मरगळ झटकली जाते. मन प्रसन्न होतं. लता दिदींच्या स्वरांनीही आपलं मन असंच प्रसन्न होतं. लता दिदींनीही सचिन यांच्या बॅटींगवर भरभरून प्रेम केलं. लता दिदींचे स्वर आणि सचिनच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांचा वर्षाव या दोन्ही गोष्टी अजरामर आहेत. जगाच्या अंतापर्यंत राहणाऱ्या आहेत. जगभरातील तमाम क्रिकेट प्रेमींचे विश्व समृध्द केल्याबद्दल भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे आभारच मानायला हवेत, असेही म्हणाले.

मास्टर ब्लास्टर सचिन यांनी, ‘ वानखेडे येथील हा पुतळा माझा बहुमान असल्याचे आणि हा बहुमान आपल्यासोबत क्रिकेट मध्ये सहकारी राहिलेल्यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. सदैव मी माझ्या देशासाठी क्रिकेट खेळलो. या मैदानाने मला खूप काही दिले आहे. इथे आल्यावर माझ्या मनात अनेक आठवणींची गर्दी उसळते. माझ्या आवडत्या मैदानावर माझा पुतळ्याच्या रुपात बहुमान होत आहे. तो मी विनम्रपणे स्वीकारत आहे. यावेळी सचिन यांनी आपल्या कारकीर्दीतील वेगवेगळ्या टप्प्यांचा उल्लेख केला. अनेक किस्से देखील सांगितले.

ज्येष्ठ नेते खासदार पवार म्हणाले की, ज्या मैदानावर खेळाच्या माध्यमातून कर्तृत्व गाजवले, त्याच ठिकाणी पुतळा उभारला जावा, असा बहुमान फार क्वचितच व्यक्तीमत्वांना मिळतो. या पुतळ्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, कारण त्यांचे पाय नेहमीच जमीनीवर राहिले आहेत. त्यांनी सन्मान डोक्यात शिरू दिला नाही.’

यावेळी पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशने क्रिकेटचे म्युझियम निर्माण करावे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कारकिर्दी विषयी स्वतंत्र दालन असावे अशी सूचना देखील केली.

बीसीसीआयचे सचिव शाह म्हणाले की, सचिन यांनी देशाच्या क्रिकेटला कुटुंबापेक्षा अधिक प्राधान्य दिले. त्यांचे क्रिकेटसाठीचे योगदान उत्तुंग असे आहे. यावेळी  शाह यांनी सचिन यांच्या फलंदाजीतील धाव संख्या आणि त्यातील योगायोग यांचा आवर्जून उल्लेख केला.

यावेळी पुतळ्याचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष  शुक्ला यांचे समयोचित भाषण झाले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *