Breaking News

नोकऱ्या देणारे बना… राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी दिला युवकांना कानमंत्र

मुंबई : प्रतिनिधी

नोकरीतल्या संधी भलेही सोडेल पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेल, स्वत:चा व्यवसाय सुरु करेन अशी भावना स्वत:मध्ये निर्माण करून नोकऱ्या देणारे बना असा कानमंत्र युवकांना देत संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे असे मत राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

भाईंदर येथील उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी केंद्रात आयोजित आर्थिक जनतंत्र परिषद (इकोनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह) चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार आदी उपस्थित होते.

समाजातील काही वंचित आणि शोषित युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’ सारखी संस्था त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असून त्यासाठी त्यांचे कौतुक केले पाहिजे अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

आर्थिक जनतंत्रात बँकांची भूमिकाही महत्वाची असून जनधन योजना आणल्यामुळे ३० कोटीहून अधिक लोकांनी बचत खाती उघडली असून यात ५० टक्के महिला या खातेधारक आहेत. ‘डायरेक्ट बँक ट्रान्सफर’मुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आणि अशा खात्यांमध्ये विविध लाभांचे पैसे थेट जमा होऊ लागले. विशेषत: महिलांनी आता केवळ बचत करण्याची प्रवृत्ती सोडून गुंतवणूक करायला शिकले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय विद्वान असे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याच सूचनेप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तसेच त्याकाळी त्यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याची टेंडर्स ही दुर्बल आणि वंचित घटकाला मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतल्याची आठवणही त्यांनी यावेळी आर्वजून सांगितली.

या परिषदेत ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले २०० यशस्वी उद्योजक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा परिषदेमुळे आणि त्यातील अनुभव कथनामुळे प्रगतीचा नवा मार्ग आपल्याला मिळेल. सक्षमीकरण हा शब्द उच्चारायला सोपा आहे मात्र प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. परंतु, पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली असून वंचित आणि दुर्बल घटकाना देखील आर्थिक अधिकार मिळतील अशा योजना आणल्या आहेत.

मी ही एक प्रशिक्षणार्थी ………

 रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मी यापूर्वी १० ते १२ वेळा प्रशिक्षणासाठी आलो. एक तुमच्यासारखाच प्रशिक्षणार्थी म्हणून मी स्व. प्रमोद महाजन यांच्याकडून तसेच आताचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या आवारात आज मी राष्ट्रपती म्हणून आलो तरी येथील अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी या संस्थेस कुठे कुठे भेट दिलीकसा राहिलोकसा शिकत गेलो हे सगळे आठवले अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *