Breaking News

मुंबईतील ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात सहभागी व्हा’

मुंबई शहर आणि उपनगरात २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम पिढी घडवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. शिवकालीन पारंपरिक देशी खेळ, आपली भारतीय संस्कृती जपायला हवी आणि त्यासाठी सर्वांनी क्रीडा महाकुंभात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे” असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत केले.

पालकमंत्री लोढा म्हणाले की, या क्रीडा महाकुंभामध्ये १६ क्रीडा स्पर्धा आणि ४ क्रीडा प्रकारात सादरीकरण, प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. साधारण १० ते १२ लाख तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. या स्पर्धेसाठी ८ जानेवारी २०२४ पर्यंत १ लाख २५ हजार खेळाडूंची नोंदणी झाली आहे. राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आणि क्रीडा भारती संस्थेच्या सहयोगाने ही देशी क्रीडा स्पर्धा आयोजित केली जात आहे. यासाठी मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाचे देखील सहकार्य लाभणार आहे.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, १६ क्रीडा स्पर्धांमध्ये लेझीम, लगोरी, लंगडी, कबड्डी, कुस्ती, मल्लखांब पंजा लढवणे, दंड बैठका, दोरीवरील उड्या, पावनखिंड दौड (मॅरेथॉन), फुगड्या, ढोल – ताशा स्पर्धा, विटीदांडू यासारख्या खेळांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांसाठी असून शाळा/महाविद्यालयातील सहभागी स्पर्धक खुल्या सहभागी स्पर्धकांबरोबर स्पर्धा करतील. ही स्पर्धा १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि खुला सर्वसाधारण वयोगट या वय श्रेणीमध्ये होईल. प्रत्येक श्रेणीतील प्रथम ४ खेळाडूंची विभागीयस्तरावर स्पर्धा करतील. एक क्यूआर कोड स्कॅन करून किंवा लिंकच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होणे शक्य होणार आहे. हा देशी क्रीडा महाकुंभ उपनगरात मुलुंड ते घाटकोपर, घाटकोपर ते कुर्ला, चुनाभट्टी, मानखुर्द, वांद्रे ते जोगेश्वरी, ओशिवारा आणि ओशिवारा ते दहिसर या ठिकाणी विविध प्रभागातील २० मैदानांवर आयोजित केला जाईल. प्रथम वॉर्ड पातळीवर क्रीडा स्पर्धा होतील. त्यातून जिंकलेल्या खेळाडूंना पुढे जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळेल.

पारितोषिक विजेत्या खेळाडू व संघास रोख रक्कम पारितोषिक एकूण रक्कम २२,६२,००० /- रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाईल. अंतिम स्पर्धा रोख पारितोषिक रक्कम संघ – रु. १०,०००/-, ८,०००/-, ६,०००/- व उत्तेजनार्थ रु. ५००० /- याप्रमाणे तर वैयक्तिक रोख पारितोषिक रक्कम रु. ३,०००/-, २,००० /-, १,०००/- व उत्तेजनार्थ ५००/- तर शरीर सौष्ठव स्पर्धा रोख पारितोषिक रक्कम रु. १०,००० /-, ९,००० / – ८,००० /- व उत्तेजनार्थ ७,००० /- आणि ढोल ताशा अंतिम स्पर्धा रोख पारितोषिक रक्कम रु. २५,००० /-, २०,००० /- १५,००० /- व उत्तेजनार्थ रु. १०,००० अशा स्वरूपात असणार आहे.

श्रीराम जीवन चरित्र स्पर्धा १० ते १७ जानेवारी २०२४ कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहे. स्पर्धा वयोगट १ ली ते २ री,३ री ते ५ वी,६ वी ते ८ वी,९ वी ते १० वी असा आहे. चित्रकला स्पर्धा, निंबध स्पर्धा, कविता लेखन, नाट्य स्पर्धा, या मराठी हिंदी, इंग्रजी भाषेत आयोजित केल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात या स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित शाळा आणि महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी आवाहन केले आहे.

Check Also

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी

नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *