Breaking News

भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करणार

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या विकासासाठी मुंबई रेल मंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहायाने ७५ हजार करोड एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. मुंबई रेल मंडळ हे १०० टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे. त्याचधर्तीवर संपूर्ण भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा करत केंद्र व राज्य शासन म्हणजे डबल इंजिन असल्याने विकासात्मक कामे जलद गतीने होत असल्याचे प्रतिपादन यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली अवघ्या १९ तास ३० मिनीटांत पोहोचविणाऱ्या पहिल्या राजधानी रेल्वेचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून झाला. या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राज पुरोहित, आशिष शेलार, प्रशांत ठाकूर, कॅप्टन तमिल सेलमन, गोपाल शेट्टी, अरविंद सावंत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए.के.गुप्ता हे उपस्थित होते.
२७ वर्षानंतर राजधानी एक्सप्रेस सुरू होत असून, मध्य रेल्वेच्या सेवेतून पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू होणे ही रेल्वे प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब आहे. १९ तास ३० मिनीटात दिल्ली गाठणारी ट्रेन कल्याण-नाशिक-जळगाव-भोपाळ-झाशी या वेगळ्या पर्यटक मार्गाने जाणार असून, जास्तीत जास्त प्रवाशांना आता दिल्लीचा प्रवास सुखर होणार आहे. एका दिवसात १०० टक्के ही ट्रेन आरक्षित झाली ही आनंदाची बाब आहे. प्रवाशांचा हा प्रतिसाद पाहता मुंबई-दिल्ली फे-या वाढविण्याचा विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून डिजीटल पद्धतीने रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रोहा येथून केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांनी एकाचवेळी दिवा -पनवेल-रोहा या ट्रेनचा शुभारंभ केला.
याचबरोबर पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर विस्तारीत सेवा ट्रेनचाही डिजीटल पद्धतीने मंत्री गोयल यांनी तर पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी मंत्री गोयल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पनवेल स्थानकातील सुधारणांच्या सुविधांचे, पश्चिम स्थानकांच्या २१ स्थानकांवर ४० नव्या एटीव्हीएम मशीनचे, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण या स्थानकावरील प्रकाश व्यवस्थेमध्ये सुधारणांचे, घाटकोपर स्थानक एईडी व्यवस्था, दिवा-वसई पुल, पेण-रोहा रेल्वेमार्गातील विद्युतीकरण आदींचे डिजीटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. तर, आठवले यांच्या हस्ते १०० फुटांचा राष्टध्वज समर्पित करण्यात आला. या राजधानीत एक्सप्रेसमध्ये वर्च्युअल ३डी ग्राफीक वाय फायद्वारे आपल्या स्मार्ट फोनवर पाहता येणार असून, त्याचाही प्रारंभ यावेळी करण्यात आला.

Check Also

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *