Breaking News

तुमच्या हद्दीतला कचरा तुम्हीच गोळा करायचा मुंबई महापालिकेचे केंद्र सरकारच्या सीपीडब्लूडीला आदेश

मुंबई: प्रतिनिधी

ऐन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अँन्टाप हिल येथील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची मोठी वसाहत आहे. मात्र गृहनिर्माण वसाहतीतील कचरा तुम्हीच उचलायचा आणि त्याची विल्हेवाटही तुम्हीच लावयाचे आदेश केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या सीपीडब्लुडी अर्थात केंद्रीय बांधकाम विभागाला मुंबई महानगरपालिकेने नुकतेच एका नोटीशीने कळविले असून या नोटीशीनुसार कारवाई न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागांची कार्यालये मुंबईत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी अँन्टाप हिल परिसरात मोठी गृहनिर्माण वसाहतही आहे. या वसाहतींची देखभाल करण्यासाठी सीपीडब्लूडी केली जाते. गेली अनेक वर्षे या वसाहतीतील कचरा उचलण्याचे काम मुंबई महापालिकेकडून नियमित करण्यात येत होते. मात्र अचानक मुंबई महापालिकेला जाग आली आणि या परिसरातील कचरा आम्ही नाही तर तुम्हीच उचलायचा व त्याची विल्हेवाट लावायची अशी सूचना वजा इशारा या वसाहतीची देखभाल करणाऱ्या सीपीडब्लूडीला दिल्याची माहिती शासकिय वसाहतीतील रहिवाशी संघाचे अध्यक्ष अशोक कुट्टी यांनी दिली.

विशेष म्हणजे जमा होणारा कचरा हा केंद्र सरकारच्याच नियमावलीनुसार वेगवेगळा करून त्याची विल्वेवाट लावण्याची सूचनाही करण्यात आली आहे. याबाबत मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे अभियंता यांच्याशी रहिवाशी संघामार्फत संपर्क साधला असता त्यांनी एफ नार्थ विभागाच्या सहाय्यक अभियंत्याकडून अशा स्वरूपाची नोटीस बजावता येत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र ती नोटीस रद्द केल्याशिवाय आम्हाला कोणतीच कारवाई करता येत नसल्याचे सदर अभियंत्याकडून सांगण्यात आल्याचे कुट्टी यांनी सांगितले.

सीपीडब्लूडी ही थेट केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या अंडर खाली येते. संपूर्ण देशभरात नगर विकास विभागाकडूनच स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना त्याच विभागाच्या कार्यालयाला अशा पध्दतीने नोटीस बजावणे कितपत योग्य आहे? असा सवालही कुट्टी यांनी केला.

याबाबत मुंबई महापालिकेच्या सॉडिल वेस्ट मँनेजमेंट विभागाचे मुख्य अभियंता भालचंद्र पाटील यांच्याशी सातत्याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *