Breaking News

बालरंगभूमीला नवसंजीवनी देणाऱ्या सुधा करमरकर यांचं निधन बालनाट्याच्या आधारवड गेल्या

मुंबई : प्रतिनिधी

बालनाट्याला नवसंजीवनी देत मनामनात बाल रंगभूमीबद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री-दिग्दर्शिका सुधा करमरकर (वय ८४) यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे बालरंगभूमी पोरकी झाल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त करण्यात येत आहे.

१९३४ मध्ये मुंबईतच जन्मलेल्या सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीच्या विकासाचा ध्यास घेऊन आपलं संपूर्ण जीवन बालनाट्यांसाठी वाहिलं. बाल रंगभूमीच्या आधारवड अशी ओळख असलेल्या सुधा करमरकर यांचे घराणे मूळचे गोव्याचे असले, तरी जन्म मुंबईत झाल्याने त्यांचं सर्व आयुष्य इथेच गेलं. त्यांचे वडील तात्या आमोणकर हे गिरगांवातील साहित्य संघशी संलग्न असल्याने सुधाताईंना घरातूनच नाट्यसेवेचं बाळकडू पाजलं गेलं होतं. बहिण ललिता यांच्या साथीने त्यांनी गायन आणि नाट्य प्रशिक्षण घेतलं. पार्श्वनाथ आळतेकरांच्या कला अकादमीमध्ये तयार झाल्यानंतर त्यांनी पुढे पार्वतीकुमार यांच्यासोबत नृत्यशिक्षणाचे धडे गिरवले. भरतनाट्यममध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सुधाताईंना वयाच्या अठराव्या वर्षीच मो. ग. रांगणेकरांच्या ‘रंभा’ या नाटकात रंभेची भूमिका साकारण्याची संधी लाभली. पहिल्याच नाटकातील भूमिका खूप गाजल्याने अल्पावधीतच त्या प्रकाश झोतात आल्या.

पहिल्या नाटकात लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर नटवर्य केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, दुर्गाबाई खोटे अशा त्या काळातील दिग्गजांचं मार्गदर्शन घेत सुधाताईंनी आपला प्रवास सुरू ठेवला. रंगभूमीविषयीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नाट्यशिक्षणाचा ध्यास घेत त्यांनी परदेश दौराही केला. अमेरिकेत जाऊन बालरंगभूमीचा अभ्यास केला. तिथेच त्यांनी मराठी रंगभूमीला बालरंगभूमीची जोड देण्याचा जणू संकल्प केला. त्यानंतर मायदेशी परतलेल्या सुधाताईंनी साहित्य संघच्या सहकार्याने ‘बालरंगभूमी-लिट्ल थिएटर’ सुरू केलं. बालनाट्य हे लहान मुलांच्या करमणुकीसाठी असून ते वास्तव असावं म्हणून सुधाताईंनी रत्नाकर मतकरी आणि इतरही काही नाटककारांकडून नाटकं लिहून घेतली. ती शाळांच्या हॉलमध्येच नव्हे, तर व्यावसायिक नाट्यगृहांतही सादर केली. यातून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच पण मुलांचं नाटक कसं असावं, याचा धडा सुधाताईंनी संबंधितांना घालून दिला. १९५९ मध्ये रंगभूमीवर आलेल्या रत्नाकर मतकरी लिखीत ‘मधुमंजिरी’ या सुधाताईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाने बलरंगभूमीसाठी नवी कवाडं उघडण्याचं काम केलं. या नाटकात सुधाताईंनी साकारलेली चेटकिणीची भूमिका विशेष गाजली होती.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *