Breaking News

मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही, इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले नमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क दिला.  डॉ. बाबासाहेब यांचे विचार व कार्य जागतिक पातळीवर पोहोचावे यासाठी इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्वसामांन्याना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून डॉ. बाबासाहेब यांनी राज्यघटना दिली, वैचारिक बळ देवून गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली.  “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’’ हा मूलमंत्र दिला.  त्यांच्या विचारांवर राज्य सरकार वाटचाल करीत आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी आणि ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल. सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कार्यरत राहील. राज्यात शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, शिष्यवृत्ती वाढविली जात आहे. सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

डॉ. आंबेडकर यांनी रुजवलेली स्वातंत्र्यसमताबंधूता ही तत्त्वे सर्वव्यापी

-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  रुजलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, भारताच्या संविधानामुळे सर्वांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळतात याचे श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे केलेले काम हे अत्यंत मोठे आहे.भारत घडविण्यात डॉ.बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जगात सर्वोत्तम संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले- उपमुख्यमंत्री फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले.  सर्वसामान्य व्यक्तीला सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी आपल्या संविधानामुळे मिळाली आहे.  आजचा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प घेण्याचा आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाची दिशा बदलण्याचे काम केले. सर्वसामान्य व्यक्तीला समान अधिकार दिले. कोणताही भेद करता येणार नाही असा बीजमंत्र त्यांनी आपल्याला दिला. समता, बंधुत्व, मानवतेचा संदेश दिला.  गौतम बुद्धांचे विचार समाजात रुजविण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून केले. देशाचे पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील ‘देशाच्या संविधानामुळे आपल्याला सर्वोच्च स्थानी पोहोचता आले’ याचा आवर्जून उल्लेख करतात. संविधानाची खरी शक्ती ही आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिभव्य स्मारकाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी मुंबई महापालिकेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे वितरण मान्यवरांना करण्यात आले.

दिव्यांग विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असलेल्या माहिती पुस्तिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *