Breaking News

अखेर गुणरत्न सदावर्ते यांना १८ दिवसांनी जामीन मंजूर मुंबई उच्च न्यायालयाने दिला २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लाबोल आंदोलनप्रकरणी मागे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राज्यातील अनेक शहरात सदावर्ते यांच्या विरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे मागील १८ दिवसांपासून सदावर्ते हे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास सुरु होता. मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन देत त्यांची तुरूंगातून सुटका केली.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तुरुंगातून सुटका होताच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दंड थोपटले असून तसेच ‘हम है हिंदुस्थानी’, असं म्हणत ही आपली ताकद असल्याचं म्हटले. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन दिलाय. त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांना अटक करणार नाहीत. यानंतर अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, कष्टकरी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका. असे गुन्हे दाखल केल्यानंतर शिखर निघत नसतं हे लक्षात राहू द्या, असं मी महाराष्ट्राच्या सरकारला आदरपूर्वक सांगतो. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मी विनंती करतो की माझी हत्या झाली, तर आपण योग्य ती पावलं उचलावी. ते घडण्याआधीही योग्य ती पावलं उचलावी.
एसटी महामंडळातील कष्टकरी जे कामावर गेलेत ते काही कोणाच्या सांगण्यावरून गेले नाहीत. गुणरत्न सदावर्तेंनी जेलमधून सांगितलं होतं तूर्त कष्टकरी कर्मचाऱ्यांनी कामावर जावं. कारण माझे कष्टकरी ६ महिने दुखवट्यात होते. मी त्यांचं कोणतंही नुकसान होऊ दिलं नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, मराठा समाज व मागासवर्गीय समाज यांच्या जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी सोमवारी (२५ एप्रिल) कोल्हापूर न्यायालयाने सदावर्ते यांना पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी दिली होती.
यानंतर माध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी आपण राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचे वंशज असल्याचा दावा केला होता. चौथा स्तंभ पाठीशी असल्यामुळे माझा खून होत नाही, असंही सदावर्ते म्हणाले होते. कोल्हापूर पाठोपाठ पुणे पोलीस सदावर्ते यांना अटक करणार आहेत. यावरून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का, असे विचारले असता सदावर्ते यांनी संविधानाची शक्ती त्रास बाजूला ठेवते असे मत व्यक्त केले होते. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हे दाखल झाले आहेत.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *