Breaking News

बीकेसीच्या धर्तीवरील कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीत भूमिपुत्रांना भागीदारी पायाभूत विकासासाठी एक हजार कोटी रूपयांच्या तरतूदीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

उद्योगाकरिता मुंबईवर अवलंबून असलेल्यांना आता दुसरा पर्याय तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचे कार्य कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येणार असून स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, संघर्ष समितीचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, मु. म. प्र. वि. प्राधिकरणचे महानगर आयुक्त यु पी एस मदान, अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांची मागणी असलेल्या २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत शासन सकारात्मक असून याबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करताना आधी कल्याण येथे रस्ते व इतर पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. स्थानिकांनी सहकार्य केल्यास त्याबाबतची जागा निश्चिती करण्यात येईल. यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण ( एमएमआरडीए ) मार्फत सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे निश्चित वेळेत  हे काम पुर्ण करणे शक्य होणार आहे. ज्या दिवशी रस्ते तयार होतील त्या दिवशी तिथल्या जमिनीच्या किंमती तीन पटीने वाढणार असून  भविष्यात दहा पट वाढ निश्चित होणार आहे. तसेच त्याचा फायदा स्थानिकांना होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास प्रत्येक भूखंडधारक भूमिपुत्रासोबत करार करण्याची आणि वेळेत काम पुर्ण करण्याची शासनाची तयारी आहे. भू संपादनाच्या कायद्यात आता बदल झाले आहेत. यात शासनाची जबाबदारी वाढली आहे. राज्य शासनाने विविध विकास योजनांसाठी गेल्या तीन वर्षात जेवढे भू संपादन केले ते स्थानिकांच्या संमतीने केले आहे. लोकांना यात आपला फायदा दिसला तर लोक स्वतःहून सहभागी होतात. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणारा आहे. त्याच्यासाठी सोयी सुविधा आणि रोजगार निर्माण करणारा आहे. या परिसरात असलेल्या इतर प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष भूमिपुत्रांना लाभ मिळालेला नाही, मात्र आता या योजनेतून शंभर टक्के फायदा हा स्थानिक भूमिपुत्रांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी लागणारी पायाभूत सुविधांची उभारणी ही तीन ते चार वर्षात पूर्ण होईल आणि येत्या सात ते आठ वर्षात इथे प्रत्यक्ष गुंतवणूक यायला सुरुवात होईल. प्रकल्प सुरु करण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे, आपल्या सर्व सूचनांवर सकारात्मक विचार करुन पारदर्शकपणे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बांद्रा कुर्ला संकुलाच्या धरतीवर कल्याण ग्रोथ सेंटरचा विकास करण्यात येणार असून स्थानिकांच्या मागण्यांना न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कल्याण ग्रोथ सेंटरची वैशिष्टे

  • मुख्यमंत्री यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या यादीत समाविष्ट असलेला प्रकल्प.
  • जमिनीचे एकत्रीकरणकरून स्थानिकांना प्रकल्पात भागिदारी.
  • अर्थव्यवस्थेला उत्तेजन मिळेल
  • रोजगाराच्या संधी निर्माण होतील
  • एकात्मिक संकुले तयार करणार
  • ग्रोथ सेंटर मध्ये असलेल्या जमिनींच्या मालकांना किमान 50 टक्के पर्यंत विकसित प्लॉट्स
  • रहिवासवाणिज्य व इतर इमारती बांधता येतील
  • टी. डी. आर. व अतिरिक्त चटई क्षेत्राची सोय
  • रेडी रेकनरच्या किमान तीन ते पाच पट दर वाढण्याची शक्यता
  • विकास योजनेतील रस्ते व आरक्षण यांनी पुर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणावर बाधित होणाऱ्या जमीन मालकांना अधिनियमाप्रमाणे पैशाच्या वा टी डी आर स्वरुपातील नुकसान भरपाई मिळू शकेल.

 

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *