Breaking News

सरकारी दबावामुळेच असीमानंद, कोडनानी यांची सुटका कट्टरतावादी धर्मांध संघटना आणि लोकांबाबत सरकारचे जाणिवपूर्वक बोटचेपे धोरण : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात सीबीआयने अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्याकरिता दाखवलेली असमर्थतता अतिशय संतापजनक असून तपास यंत्रणा सरकारच्या प्रचंड दबावाखाली काम करित आहेत. कट्टरतावादी धर्मांध संघटनांच्या बाबतीत भाजप सरकारने जाणिवपूर्वक घेतलेले बोटचेपे धोरण याला कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत माया कोडनानी आणि असीमानंद यांची सुटका सरकारी दबावामुळेच झाल्याचा आरोपही केला.

खा. चव्हाण म्हणाले की, देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून भाजपच्या धर्मांध राजकारणाला पूरक असणा-या कट्टरतावादी संघटनांना मोकळे रान मिळालेले आहे. सनातन संस्थेविरोधात अनेक पुरावे असतानाही या संस्थेवर बंदी घातली जात नाही. किंबहुना सनातन संस्थेचे पदाधिकारी मंत्रालय आणि विधिमंडळात मुक्त संचार करित असून ते सरकारच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे.

भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांच्या बाबतही सरकारने जाणिवपूर्वक बोटचेपे धोरण स्वीकारलेले आहे. मक्का मशीद, अजमेर आणि समझौता एक्स्प्रेस इत्यादी दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील आरोपी एका मागून एक सुटताना दिसत आहेत. याकरिता तपास यंत्रणा जाणीवपूर्वक कुचकामी ठरतील हे सरकारकडून पाहिले जात आहे. माया कोडनानी आणि असीमानंद यांची सुटका भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रचंड मोठे प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे. कनिष्ठ न्यायालयाने माया कोडनानी यांना २८ वर्ष कारावासाची शिक्षा  ठोठावली असताना आणि त्यांचा दंगलीमधील सहभाग स्पष्ट असताना गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची केलेली सुटका ही अत्यंत धक्कादायक असल्याचे मत मांडत  मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी स्वामी असीमानंद आता भाजपचा प्रचारक म्हणून काम करणार आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे दुष्ट चरित्र दर्शवणारे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येसंदर्भात आरोपीपर्यंत पोहोचता येऊ नये अशा दिशेने तपास सुरु आहे. मा. उच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. यावरून सरकार राजधर्म पाळण्यात अपयशी ठरले आहे हे सिध्द होते असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

 

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *