मुंबईः विशेष प्रतिनिधी
कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पाचे दुसऱ्यांदा होणारा भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबईच्यादृष्टीने महत्वाचा असलेल्या बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ साली वरळीतील जांबोरी मैदानावर प्रतिकात्मक पध्दतीने केले होते. तरीही राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील विद्यमान गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधत २७ जुलै २०२१ रोजी पुन्हा या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे आव्हाड यांनी जाहिर केले.
वास्तविक पाहता २२ जुलै २०२१ रोजी कोकणातील पावसाने रौद्र रूप धारण करत चिपळूण मध्ये वसिष्ठ नदीचे पाणी घुसून पुरपरिस्थिती निर्माण झाली. त्यानतंर दुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी गृहनिर्माण मंत्र्यांनी बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर केला. परंतु अतिवृष्टीमुळे पुराबरोबरच दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असताना भूमिपूजनाचा कार्यक्रम काही काळासाठी रद्द करणे अपेक्षित होते. तरीही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आजस्थितीला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुर्घटनांमध्ये १५० हून अधिक जणांचे मृत्यू झाले असून जवळपास १०० नागरीक बेपत्ता झाले आहेत.
यासंदर्भात आज मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, उद्या मंगळवारी २७ जुलै २०२१ रोजीचा नियोजित भूमिपूजनाचा कार्यक्रम जवळपास रद्दच समजण्यात यावा. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा पध्दतीचे कार्यक्रम करणे उचीत होणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही उद्या पुन्हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही दौऱ्यावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होणे आणि त्यास उपस्थित राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे स्पष्ट केले.
परंतु यासंदर्भात गृहनिर्माण विभागाकडून अधिकृतरित्या बीडीडी चाळीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याबाबतची माहिती अद्याप देण्यात आली नाही.
