Breaking News

शोषित, वंचितांच्या शोषणाविरूध्द आवाज उठविणाऱ्या पत्रकारास मूकनायक पुरस्कार देणार

३१ जानेवारीला दिल्लीत होणार दिमाखदार वितरण सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती

दिल्ली : प्रतिनिधी

वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखणीलढा देणाऱ्या आणि सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारीता पुरस्कार ३१ जानेवारीला दिल्लीमध्ये एका दिमाखदार समारंभात देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली. पुरस्कार वितरण समारंभाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांना यासंबंधिची माहिती देत होते.

शोषित,वंचितांच्य हितासाठी उल्लेखनिय पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांसाठी २०१८-१९ या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारिता पुरस्कार देण्याची घोषणा बडोले यांनी ऑक्टोबर महिन्यात केली होती. त्यानुसार आज त्यांनी दिल्लीत पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर केली.

यासंबंधी पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती, ओबीसी, महिला, कामागर, अशा वंचित शोषित घटकांच्या न्याय हक्कासाठी निर्भीड लेखन करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. बाबासेहब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या निर्भीड बाण्याचा वारसा जपणाऱ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रत्येकी एका पत्रकारास १ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक तर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रत्येकी एका पत्रकारास २५ हजार रूपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक असे राज्यस्तरावर एकूण ४ पुरस्कार देण्यात येतील असे बडोले यांनी सांगितले.

प्रस्थापितांच्या व्यवस्थेत सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात दुर्बल आणि वंचित असलेल्या मुक घटकांचा आवाज बुलंद करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मुकनायक’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मुकनायक’ वृत्तपत्र सुरु करून पत्रकाराची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली. त्यामुळेच आम्ही डॉ. बाबासाहेबांच्या नावाने मुकनायक पत्रकारिता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या समता प्रतिष्ठाणच्या माध्यमातून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रत्येकी  एका पत्रकारास १ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रत्येकी एका पत्रकारास प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून २५ हजार रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देऊन लढवय्या पत्रकारांचा गौरव करण्यात येईल, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.

 गुरूवार दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता, दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय मेमोरियल सेंटर,नवी दिल्ली, येथे सदरील पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय राज्यामंत्री, विभागाचे सचिव, आयुक्त, बार्टीचे महासंचालक, समता प्रतिष्ठानचे मुख्य समन्वयक, माहिती महासंचालनालयाचा एक प्रतिनिधी, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीचे २ प्रतिनिधी यांचा समावेश  असलेल्या समितीने  उल्लेखनीय पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांची नावे निश्चित केली असून ती लवकरच जाहीर केली जातील असेही बडोले यांनी सांगितले.     

Check Also

कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यायचाय तर सेवायोजन नोंदणी आधार लिंक करा बेरोजगारांना विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *