Breaking News

गेल्या वर्षभरात मुंबईतील १४०२ बालकांनी गमावला प्राण तर राज्यात १३ हजार ७० बालकांचा मृत्यू

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील नवजात बालमृत्यूच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी सरकार आणि विविध सामाजिक संघटनाकडून प्रयत्न करण्यात येतात. तरीही बालमृत्यूच्या संख्येत वाढच होत असून गेल्यावर्षी तब्बल १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाला तर मुंबईत १ हजार ४०२ बालमृत्यू झाल्याचे एच.एम.आय.एस. च्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत उघडकीस आली.
राज्यात नवजात बालकांचा मृत्यूत वाढ झाल्यासंदर्भात आमदार मंगेश कुडाळकर, आशिष शेलार यांच्यासह एकूण ४६ आमदारांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील माहिती समोर आली आहे. दरम्यान हे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी विभागातर्फे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले.
एच.एम.आय.एस. च्या अहवालानुसार राज्यात सन २०१८-१९ या काळात २ लाख ११ हजार ७७२ बालकांचे वजन जन्मतःच अडीच किलोपेक्षा कमी असून मुंबई शहर उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची २१ हजार १७९ बालके जन्माला आली.  १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ च्या कालावधीत राज्यात १२ हजार १४७ अर्भकांचा मृत्यू, ११ हजार ६६ बालमृत्यू व नवजात मृत्यू झाले आहेत. तसेच १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत १ हजार ७० मातामृत्यू झाल्याची बाबही या अहवालात नमूद करण्यात आली.
या अहवालानुसार गर्भवती महिलांमध्ये प्रसुती पूर्व उच्च रक्तदाब,  प्रसुती पूर्व व पश्चात अति रक्तस्त्राव, प्रसुती पश्चात किंवा गर्भपात पश्चात जंतूदोष व रक्त क्षय आदी कारणे असल्याचे सांगण्यात आले. तर नवजात बालकांच्या मृत्यूस अकाली जन्माला आलेले बाळ, जन्मतः कमी वजनाचे बालक, जंतु संसर्ग, न्युमोनिया, सेप्सीस, जन्मतः श्वासवरोध, आघात, रेस्पिरेटरी, डिस्ट्रेस सिंड्रोम आदी कारणे सांगण्यात आली आहेत.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *