मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीत पदवीधर मतदारसंघातून ३ पैकीपैकी एक विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने तर २ शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पाच जागांसाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणूकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार आहे.
विधान परिषदेवर औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून सतीश चव्हाण, नागपूरमधून अनिल सोले यांचा कार्यकाळ १९-७-२०२० रोजी संपला. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मुदत संपण्यापूर्वीच विधानसभा निवडणूकीत विजयी झाले. तर शिक्षक मतदार संघातून अमरावती विभागतून श्रीकांत देशपांडे, पुणे विभागातून दत्तात्रय सावंत यांचाही कार्यकाळ १९-७-२०२० रोजी संपुष्टात आला. त्यामुळे या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूका घेण्यात येणार आहेत.
या निवडणूकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत दाखल करता येणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
