Breaking News

धर्माचं मर्म समजलं पाहिजे ‘मंत्र’च्या संगीत प्रकाशन सोहळ्यात अभिनेता मनोज जोशी यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी आजवरच्या आपल्या कारकिर्दीत विविध भाषांमधील १२२ सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. ‘मंत्र’ या आगामी सिनेमात त्यांनी एका पुरोहिताची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना धर्माचं मर्म समजणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं प्रतिपादन  जोशी यांनी केलं.

‘मंत्र’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आजवर कधीही प्रकाशत न आलेला मुद्दा मांडण्यात आला आहे. धर्म कार्य करणाऱ्या पुरोहित्यांच्या घरात डोकावत वास्तव चित्र समोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. एरव्ही मोजकंच बोलणारे मनोज जोशी ‘मंत्र’बाबत भरभरून बोलले. ते म्हणाले की, वास्तवात पौरोहित्य करणारी माझी ही आठवी पिढी आहे. या सिनेमात मी साकारलेलं श्रीधरपंत हे कॅरेक्टर माझ्या आजोबांचं आहे. बालपणापासून मी माझ्या आजोबांना पाहात आलो आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील मला आवडलेल्या काही मोजक्या भूमिकांपैकी एक अशी ही भूमिका आहे. या सिनेमाचा विषय धाडसी आहे आणि असं धाडस केवळ मराठी माणूसच करू शकतो. यासाठी मी ‘मंत्र’च्या निर्मात्यांचं कौतुक करतो. त्यामुळे हा सिनेमा हिंदीत व्हावा असा वाटत होतं. या सिनेमाची आॅफर देण्यासाठी जेव्हा ‘मंत्र’ची टिम जेव्हा मला भेटायला आली, तेव्हा मी त्यांना केवळ १५ मिनिटांचा दिला होता. अन्य कुठेतरी जायचं होतं. त्यासाठी एक व्यक्ती माझी प्रतिक्षा करीत होती. ‘मंत्र’च्या टिमने जेव्हा सिनेमाची कथा सांगायला सुरुवात केली तेव्हा मी मंत्रमुग्धच झालो. हि आपल्याच घरातील कथा असल्याचं जाणवलं आणि पुढील दोन तास नॅरेशनच ऐकत बसलो. या सिनेमाच्या निमित्ताने वास्तव परिस्थितीचा धांडोळा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असल्याचं माझं वैयक्तिक मत आहे. आज धर्माचं मर्म काय आहे हे प्रत्येक धर्मातील, प्रत्येक पंथातील माणसाला कळणं खूप गरजेचं आहे आणि हेच या सिनेमाच्या निमित्तानेही अधोरेखित करण्यात आलं आहे.

ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेला, हर्षवर्धन लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मंत्र’ लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. आजच्या काळातला अत्यंत संवेदनशील विषय ‘मंत्र’ या चित्रपटात संतुलितपणे मांडण्यात आला आहे. एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांडाला न मानणारी मुलगी येते तेव्हा ‘मंत्र’ची कथा घडते. लेखक, दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी ‘मंत्र’च्या माध्यमातून आजच्या तरुणाईचा अध्यात्मिक विषयावरचा गोंधळ नेमकेपणाने मांडला आहे. ‘मंत्र’ला अविनाश – विश्वजित या संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे. चित्रपटात एक वेस्टर्न बाजाचं गाणं, पुण्याची ओळख बनलेल्या ढोल ताशाचं एक गाणं आणि एक विरह गीत असे वेगवेगळ्या जॉनरचं संगीत ऐकायला मिळणार आहे. तसेच ‘मंत्र’च्या शीर्षक गीतासाठी विनया क्षीरसागर यांनी संस्कृत मध्ये गीत लिहिलं आहे. अजय गोगावले, अवधूत गुप्ते, रोहित राऊत, धवल चांदवडकर आणि विश्वजित जोशी यांनी ‘मंत्र’साठी पार्श्वगायन केलं आहे. पार्श्वसंगीतात ३ संस्कृत काव्यासह पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा उत्कृष्ठ मिलाफ जमवलेला आहे.

या चित्रपटात मनोज जोशी यांच्यासोबत सौरभ गोगटे आणि दीप्ती देवी प्रमुख भूमिकेत आहेत. अभिनेता पुष्कराज चिरपुटकर, सिद्धेश्वर झाडबुके, सुनील अभ्यंकर, धीरेश जोशी, राजेश काटकर यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसोबत शुभंकर एकबोटे आणि सुजय जाधव सारखे तरुण आणि नवे चेहरेही यात पहायला मिळतील. वृषाली काटकर, अनुराधा मराठे आणि शुभांगी दामले यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. पिफ २०१८मध्ये या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *