Breaking News

चित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला इरफान खान यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांनी वाहीली श्रद्धांजली

मुंबई:प्रतिनिधी
अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे.
दुर्धर असा कॅन्सर झाला असूनही न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

विविधांगी भूमिकांमुळे अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील-पवार
अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कला जगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितच महान होते. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याची साक्ष देतात. कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन त्यांनी त्यांच्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता, परंतु आज अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी ही माझ्यासारख्या असंख्य चित्रपट रसिकांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असं उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *