Breaking News

प्रितम मुंडे, चित्रा वाघ, भांडारी, राम शिंदेसह भाजपाची नवी कार्यकारीणी जाहीर केशव उपाध्ये बनले प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते

मुंबई: प्रतिनिधी
सत्तेतून उतरल्यानंतर भाजपातील अंतर्गत राजकिय धुसफूस काही काळ थांबलेली असतानाच नाराज पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश महेता आणि पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी नाही किमान पक्ष संघटनेच्या कामात तरी सामावून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर पक्ष संघटनेतही या नेत्यांना डावलत पंकजा मुंडे यांच्या भगिणी तथा खासदार प्रितम मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेल्या चित्रा वाघ, मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, राम शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासह माजी मंत्री जयकुमार रावळ, संजय कुटे, सुरेश हळवणकर यांच्यासह १३ जणांची या पदावर नियुक्ती आज जाहीर करण्यात आली.
याशिवाय पक्षाच्या महामंत्री पदी सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संघटन महामंत्री म्हणून विजय पुराणीक यांना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच प्रदेश भाजपाच्या मुख्य प्रवक्ते पदी केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारिणीत तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र व सामाजिक विभाग लक्षात घेऊन सर्व विभागाना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. त्य़ाचबरोबर या पदाधिकारी कार्यकारिणीत 33 टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते व प्रसिध्दी माध्यम प्रमुख यांचीही नियुक्ती करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांसोबतच युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा यांच्या प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पक्ष पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांशिवाय 68 जणांची कार्यकारिणी आहे. त्याशिवाय 139 जण निमंत्रित असून 58 जण हे विशेष निमंत्रित असतील. सर्व आमदार-खासदार हे कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्य असतील. त्याशिवाय कोषाध्यक्ष, कार्यालयप्रभारी, सहकार्यालयप्रभारी, प्रदेश कार्यालयमंत्री व सहकार्यालमंत्री यांचीही आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *