Breaking News

अस्मिता योजनेसाठी वितरक म्हणून २ हजार ३७२ बचतगटांची नोंदणी दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात पोहोचली अस्मिता योजना

मुंबई : प्रतिनिधी अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी वितरक म्हणून अवघ्या एका आठवड्यात २ हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. या  माध्यमातून हे बचत गट कार्यरत  असलेल्या साधारण दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात ही योजना पोहोचली आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११ हजार ४३९ मुलींच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी ५१८ जणांनी स्पॉन्सरशिप स्विकारली  आहे. यातून सुमारे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांत तर महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणे, त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दुहेरी उद्देशाने जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सॅनिटरी नॅपकीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या मोबाईल ॲपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ दिवसात बचतगटांचा चांगला प्रतिसाद  मिळत आहे. सॅनिटरी नॅपकीनचे वितरक म्हणून काम करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सायंकाळपर्यंत २ हजार ३७२ बचत गटांनी या ॲपवर नोंदणी केली. लवकरच राज्यातील प्रत्येक गावांतील किमान एक बचत गट या ॲपवर नोंदणीकृत होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व्यापक प्रयत्न करीत आहे. बचतगटांची नोंदणी झाल्यानंतर लगेच सॅनिटरी नॅपकीनची प्रत्यक्ष विक्री सुरू केली जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वी सायंकाळपर्यंत जिल्हावार पुढीलप्रमाणे बचतगटांची नोंदणी झाली आहे. अहमदनगर ११०, अमरावती ६,औरंगाबाद ८२, बीड १३४, भंडारा २३, बुलढाणा १४९, चंद्रपूर ३०२, धुळे ७६, गडचिरोली ९, गोंदिया ३१, हिंगोली १३, जळगाव १६५,जालना २८, कोल्हापूर ८६, लातूर ४१, नागपूर ४८, नांदेड २७, नंदुरबार २९, नाशिक ३०, उस्मानाबाद ६४, पालघर ५०, परभणी ५१, पुणे २९, रायगड १९, रत्नागिरी ६८, सांगली ४३, सातारा ९४, सिंधुदूर्ग ३८, सोलापूर १२९, ठाणे १२, वर्धा ३२८, वाशिम १७,यवतमाळ ४१ इतकी नोंदणी झाली असून अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, महिलांमध्ये मासिकपाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीन वापराचे प्रमाण सध्या फक्त १७ टक्के इतके आहे. पहिल्या वर्षातग्रामीण भागात हे प्रमाण ७० टक्के इतके करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. म्हणजे पहिल्या वर्षात ग्रामीण भागातील सुमारे १.५ कोटी मुली आणि महिलांपर्यंत सॅनिटरी नॅपकीन पोहोचविण्याचा आमचा ध्यास आहे.

 

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *