Breaking News

महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे असे एकूण १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील सव्वा लाख ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचा महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार पात्र शेतकऱ्यांना लाभ होणार असून सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीकर (राजस्थान) येथे आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे वितरण आणि सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.

शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत होते. आता बियाण्यांपासून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि योजनांची माहिती एकाच ठिकाणी या समृद्धी केंद्रांमध्ये उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी हे समृद्धी केंद्र ‘वन स्टॉप सेंटर’ सारखे काम करेल. तसेच वर्षाअखेरीस देशात अशी पावणे दोन लाख केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे. म्हणूनच शासनाने ९ वर्षात शेतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेत. बियाण्यांपासून बाजारपेठपर्यंत नवीन व्यवस्था निर्माण केली. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २ लाख ६० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ देणारी ही जगातील एकमेव योजना आहे. सोबतच युरियाच्या किमतीसुद्धा शासनाने कमी केल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात येते. भारताताच्या तुलनेत इतर विकसनशील देशात युरियाचे दर चौपट आहेत तर विकसित देशात ते १० ते १२ पट आहेत. शेतकऱ्यांसाठी सल्फर कोटेट युरिया गोल्ड तयार केले आहे. पिकांसाठी आवश्यक असणारे सल्फर युरियासोबतच पिकांना मिळेल आणि त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

देशातील पौष्टिक तृणधान्य आता जगातील मोठ्या बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत. ‘श्री अन्न’ म्हणून त्याला विकसित देशातही मागणी आहे. देशात पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन, त्यावर प्रक्रिया आणि त्याची निर्यात या सर्वच बाबीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा लाभ देशातील लहान शेतकऱ्यांना होतोय, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना लाभ; १ हजार ८६६ कोटी रुपये होणार जमा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले असून महाराष्ट्रातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे, त्या लाभापोटी सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारी ऐतिहासिक योजना असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे ६ हजार व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ६ हजार असे वर्षाला एकूण १२ हजार शेतकऱ्याला मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी कृषी विभाग काम करत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *