Breaking News

“सिल्वर ओक”च्या मान्यतेने “मातोश्री” कडून होणार प्रशासकीय बदल्या वित्त सचिवासह अनेकांचे विभाग बदलणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळचा विस्तार झाल्याने आता राज्य सरकारकडून प्रशासकिय अर्थात सचिवांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. या बदल्यांवरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा प्रभाव राहणार असून या बदल्या लवकरच होणार असल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मागील सरकारच्या काळातील ब्लु आईज्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आएएस अधिकाऱ्यांना प्रामुख्याने मंत्रालयाच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी गतसरकारच्या नुकसानकारक योजनांची वेळोवेळी जाणीव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दिली. त्यांना चांगल्या खात्याच्या प्रधान सचिव पदावर नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजाची माहिती, त्यांच्या पध्दती आणि एकाच विभागात किती काळ राहीले याची माहिती गोळा करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येत आहे. प्रामुख्याने कामास प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्या खात्यांच्या प्रधान सचिव पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. तर जे निर्णय क्षमतेत वेळ खावू धोरण स्विकारतात अशा आयएएस अधिकाऱ्यांना तुलनेने कमी महत्वाच्या खात्यांचा पदभार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आयएएस अधिकाऱ्यांची यादी तयार झाल्यानंतर नियुक्त्यांची संभावित यादी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. या दोघांची मान्यता मिळाल्यानंतरच या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन टप्प्यात सर्व विभागांच्या सचिवांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *