Breaking News

वृक्षरोपणामुळे महाराष्ट्र देशात पहिला भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात वाढ

मुंबई :प्रतिनिधी

राज्यातील जनतेने “मन की बात” ऐकताना “वन की बात” केली त्यामुळे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनामध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आले.  भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्यात  दोन वर्षात या क्षेत्रात २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली. याचे सर्व श्रेय शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी तसेच या उपक्रमाची माहिती देण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार मंगल प्रभात लोढा, वन सचिव विकास खारगे यांच्यासह राज्यभरातील वनाधिकारी आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये स्वामीनारायण संस्था, पतंजली योग समिती, ईशा फाऊंडेशन, पतंजली आयुर्वेद कंपनी लि, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, अनिरुद्ध अकादमी ऑफ डिसॅस्टर मॅनेजमेंट, जीवनविद्या मिशन, तुलसी भवन बालमित्र मंडळ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्र  सरकारने अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने भारतातील वनांचा अभ्यास करून अहवाल जाहीर केला. ज्यामध्ये चार क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिले आले. यामध्ये वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनाशिवाय वनक्षेत्रात वॉटर बॉडिज निर्माण करणे, बांबू लागवड आणि कांदळवन संरक्षण आणि संवर्धन यांचा समावेश आहे.  वन आहे. तर जल आहे आणि जल आहे तर जीवन हे लक्षात घेऊन काम करणारा आपला चिंतनशील समाज आहे. दोन वर्षातील लोकसहभागाने राज्याला हे यश मिळवून दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक धर्मातील वृक्षाचे महत्व सांगणारे पुस्तक वन विभागाने तयार केले असून लवकरच ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे सांगून ते पुढे म्हणाले की, वृक्ष लागवडीत आपल्याला विश्वासार्हता आणि पारदर्शकता ‍निर्माण करावयाची आहे. त्यासाठी कमांड रूमची निर्मिती करण्यात आली असून लावल्या जाणाऱ्या प्रत्येक वृक्षाबाबतची माहिती पब्लिक डोमेन मध्ये टाकण्यात येऊन ती लोकांना उपलब्ध करून दिली जात आहे. आपल्याला वृक्ष कापणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणाऱ्या हातांची संख्या वाढवायची आहे, हे राष्ट्र निर्माणाचे आणि राष्ट्र निष्ठेचे काम आहे ही भावना आपल्याला निर्माण करावयाची असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

वृक्ष अमर नाही. लावलेल्या रोपातील सगळेच रोपं जगतात असेही नसते त्यामुळे या पुण्याईच्या कामात जे लोक सहभागी होतात त्यांच्या मनात संदिग्धता निर्माण करू नका, उलट यात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा, आपल्याला सर्वांना मिळून हे मिशन पुढे न्यायचे आहे. ज्या धार्मिक- अध्यात्मिक संस्थांना ट्रायपार्टी कराराद्वारे सात वर्षांसाठी वृक्ष लागवडीसाठी जमीन हवी आहे अशा संस्थांच्या माहितीसाठी राज्यात वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या लॅण्ड बँकेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल असेही ते म्हणाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *