Breaking News

पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या आक्रमतेपणावर सध्या झाकण, पण…. कोणापुढे झुकणार नाही वक्तव्य करत इशारा

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज१८ मार्च रोजी पार पडले. या कार्यक्रमाला राज्यातल्या तसेच केंद्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आणि आमदार पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी भाषणा दरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या, कार्यकर्त्ये विचारतात साहेब तर आक्रमक होते. पण तुम्ही फारच सौम्य वागताय. मुंडे साहेबांनी संघर्षातून मिळवलं. पण सध्या आमच्या आक्रमतेपणावर संयमाच झाकण असलं तरी आता आम्ही कुणासमोर झुकणार नाही. योग्य वेळी आक्रमकता दाखवू असे सांगत आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला.

पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू झाल्यानंतर काही मिनिटं पावसाची रिमझिम झाली. पाऊस सुरू होताच पंकजा म्हणाल्या की, मागे आपण भगवान भक्ती गडावर गेलो तिथे जोरदार पावसाने हजेरी लावली होती. गोपीनाथ गडावर कार्यक्रम झाले तिथेही पावसाने हजेरी लावली. हा सतत येणारा पाऊस येत्या दिवसांसाठी शुभ शकून घेऊन येत आहेत. या पावसाच्या प्रत्येक थेंबात ज्वाला आहे. ही ज्वाला तुमच्यात असणार आहे. आता आम्ही थकणार नाही. आता आम्ही रुकणार नाही. आम्ही कुणासमोर कशासाठीही झुकणार नाही.

पंकजा मुंडे जेव्हा म्हणाल्या की, आम्ही कुणासमोर कधी झुकणार नाही, तेव्हा त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पंकजा यांना अलिकडच्या काळात पक्षात डावललं जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर कधी त्या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येतात. तसेच त्या बऱ्याचदा पक्षाच्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. तेव्हा देखील राजकीय चर्चा सुरू होतात. आजही त्यांच्या वक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे होता याबाबत चर्चा सुरू झाली.

दरम्यान, पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर भाजपाच्या कार्यकर्त्यांची फौज असताना मराठवाड्यात पक्षाला जागा का कमी मिळाल्या असा सवाल करत हे विचारणं माझं काम नाही. पण ज्यांची ही जबाबदारी त्यांनी ते पहावं असे सांगत अप्रत्यक्ष भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *