Breaking News

लम्पी आजाराबाबत पदुम आयुक्तांनी सांगितले ‘या’ गोष्टींची काळजी घेण्यास लम्पी रोग नियंत्रणासाठी पशुसंवर्धन यंत्रणेसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी

लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागाशी संवाद साधताना ते बोलत होते.

पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी सांगितले, लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा कीटककांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यामुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती बाळगळण्याचे कारण नाही, परंतु खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
पशुपालकांना आवाहन करताना सिंह यांनी सांगितले की, लम्‍पी पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. यामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३०-४१८ अथवा राज्यातील कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
सिंह यांनी सांगितले की, खाजगी पशु वैद्यकीय डॉक्टर हे लम्‍पी बाधित पशुधनासाठी महागडी प्रतिजैविके आणि इतर औषधे लिहून देत आहेत तर एल एस डी निर्धारित उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने व तालुका लघुपशुचिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी बाधित पशुसाठी त्यांच्या दारात मोफत उपचार घ्यावेत याबाबत काही तक्रार असल्यास विभागाच्या जिल्हा उपायुक्त किंवा खात्याच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, तसेच लम्‍पी चर्मरोगाची लक्षणे दिल्यास दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन उपचार करून घ्यावेत.

दहा लक्ष लस मात्रा; अधिक गतीने लसीकरण करावे
राज्यात लम्‍पी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात बाधित क्षेत्रात ५ किमी परिघातील गायींना लसीकरण करण्यासाठी १० लाख लस मात्रांची खेप प्राप्त झाली आहे. अधिक गतीने लसीकरण करावे व रोग पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावे, अशा सूचना यंत्रणांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लम्‍पी रोगाची लक्षणे
सिंह यांनी आजाराच्या लक्षणांविषयी सांगितले की, प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते, लसिकाग्रंथींना सूज येते, सुरुवातीस ताप येतो, दूध उत्पादन कमी होते, चारा खाणे पाणी पिणे कमी होते, हळूहळू दहा-पंधरा मी. मी. व्यासाच्या गाठी, प्रामुख्याने डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येवून दृष्टी बाधित होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात अशी लक्षणे दिसतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
लम्‍पी हा संसर्गजन्य आजार असल्याने रोग होवू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग झाल्यास त्याचा प्रसार होवू नये, याकरिता पशुपालकांनी पुढीलप्रमाणे आवश्यक काळजी घ्यावी.
बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
जनावरांमध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लम्‍पी सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. त्याकरिता १% फॉर्मलीन किंवा २-३ % सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २४ यांचा वापर करता येईल. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावताना मृत जनावरांच्या खाली व वर चुना पावडर टाकावी.
या रोगाचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माश्या, गोचीड इ.) होत असल्याने निरोगी सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी. रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. बाधित जनावरांना औषधोपचार करावेत.

रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी – विक्री थांबवावी
लम्‍पी औषधोपचाराने बरा होत असल्याने, पशुपालकांनी प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्र.१८००२३३०४९८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर तत्काळ द्यावी. असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ ( The Prevention and Control of Infectious & Contagious Diseases in Animals Act, 2009) मधील कलम ४ (१) नुसार पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ही माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *