Breaking News

दिल्लीतील नाट्यावर अजित पवार म्हणाले,… त्यामुळे मी बोलणं टाळलं गर्दी जमवण्यासाठी ही वेळ मुख्यमंत्र्यांवर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे...

पैठण येथील सभेला गर्दी जमवण्याकरीता अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, पर्यवेक्षिकांना उपस्थित राहण्याचे पत्र काढावे लागते ही वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना लेखी स्वरूपात पत्र काढत आदेश दिला जातो याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाचे पत्रच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. मंत्र्यांच्या निर्देशाशिवाय अधिकारी आदेश काढू शकत नाहीत असेही ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशनापर्यंत उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. आमदारांची नाराजी वाढेल. पालकमंत्री नेमलेले नाहीत. पालकमंत्र्यांच्या यादीत इच्छूकांची संख्या जास्त असल्याने या नेमणूका रखडल्या आहेत. राज्यावर अनेक संकटे येत आहेत. नुकतीच अतिवृष्टी आणि आता ढगफुटी झाली. धरणाचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे त्याखालील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष द्यायला कोण आहे. कुणावर तरी जबाबदारी नेमायला हवी होती. स्वातंत्र्यदिनी २० लोकांना झेंडावंदन करता आले इतर १६ ठिकाणी प्रशासकीय अधिकार्‍यांनी झेंडावंदन केले हे लोकशाहीमध्ये मान्य होणारी गोष्ट नाही. कारण लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना नेमा परंतु जो काही कारभार सुरू आहे त्या कारभाराचा धिक्कार व निषेधही त्यांनी यावेळी केला.

त्यामुळे मी बोलणं टाळलं…
दिल्लीमध्ये दोन दिवसाचे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी मार्गदर्शन केले. शिवाय इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. आमच्या राज्याच्यावतीने आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याची भूमिका मांडली. या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष यांनी बोलणं अपेक्षित असतं त्यामुळे मी बोलणं टाळलं असे स्पष्ट करतानाच माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला. वास्तविक मला तिथे कुणी बोलू नका असं सांगितलं नाही. मीच माझी भूमिका त्याठिकाणी घेतली. मी एकटाच बोललो नाही असं नाही तर वेळे अभावी सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण बोलू शकले नाहीत. दोनवेळा वॉशरुमला गेलो म्हणून वेगळा विषय चालवण्यात आला. कारण नसताना गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. वस्तुस्थिती आधारित बातम्या देण्याची जबाबदारी माध्यमांची आहे मी राज्यात गेल्यावर माध्यमांसमोर बोलणार आहे असेही त्यांनी सांगितले.

१९९१ ला खासदार झालो म्हणजे ३१ वर्षे झाली तेव्हापासून सहसा मी राष्ट्रीय पातळीवर उपस्थित राहतो. परंतु मी मार्गदर्शन करत नाही, राज्यात सभा, अधिवेशनात मी बोलतो माझी भूमिका स्पष्ट करतो. त्यामुळे तुमचे गैरसमज दूर करुन राज्यासमोरचे सध्याचे प्रश्न व राज्यसरकारची चुकीचे धोरणं मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुणीपण उठतो आणि रिव्हॉल्व्हर काढतो… हे काय बिहार – युपी आहे का?…
राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला असताना ठाकरे व शिंदे गटात हाणामारी झाल्याचे समजले. कुणीपण उठतो आणि रिव्हॉल्व्हर काढतो… हे काय बिहार – युपी आहे का? असा सवाल करतानाच मला या राज्यांची बदनामी करायची नाही. नाहीतर म्हणतील या राज्याची बदनामी करतोय परंतु एका सत्ताधारी पक्षाचा आमदार असं करायला लागला तर राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? गृहमंत्री काय करत आहेत? पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. राज्याच्या हिताचे नाही असे खडेबोलही त्यांनी सुनावले.
मध्यंतरी एका आमदाराने तंगड्या तोडण्याची भाषा केली होती. त्यावेळी विधानसभेत या वर्तनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या आमदारांना समज द्यावी असे सांगितले होते. परंतु तरीसुद्धा तोच प्रकार सुरु आहे. हे काय चाललंय असा संतप्त सवालही त्यांनी शिंदे सरकारला केला.

मी नास्तिक नाही. परंतु राज्याच्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने दर्शनासाठी किती वेळ घालवायचा त्यालापण काही मर्यादा असतात. आपल्या राज्यात पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होतोय असं नाही असा टोला लगावतानाच मिरवणूका किती काळ चालवायच्या याला काही बंधने असावीत. आवाजाची मर्यादा नव्हती. ३६ तास मिरवणूका चालल्या याकडेही सरकारचे लक्ष वेधले.

जग कुठे चाललंय आणि यांचा पितृपक्षाने कार्यभार अडलाय…
पितृपक्ष असल्याने बर्‍याच मंत्र्यांनी कार्यभारच स्वीकारला नाही असं कळतं. बरेच मंत्री मंत्रालयाच्या कार्यालयात गेले नाहीत. याबाबत बातम्यांचे कात्रण दाखवत अजित पवार यांनी असं कुठे असतं का? जग कुठे चाललंय याकडेही जनतेचे लक्ष वेधले.

मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड कामाचा ताण असतो आणि त्यात देवदर्शन करुन आम्हाला गणपतीलाही जाऊन ते सगळं बघून फाईल काढायच्या आहेत आणि त्यात असे मेळावे कुठे – कुठे घ्यायचे आहेत आणि गर्दी होत नाही म्हणून तिथे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांना गोळा करायचं असा उपरोधिक टोला लगावतानाच अरे हे काय चाललंय असा संतप्त सवालही त्यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *