Breaking News

‘ड्रायव्हर’च्या ट्रोलवरून रोहित पवार यांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले… स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो

नुकतेच देशातील आघाडीचे उद्योगपती तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे उद्योजक गौतम अदानी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात गेले होते. त्यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानीच्या गाडीचे सारथ्य केल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावर भाजपासह अनेकांनी समाज माध्यमांवर  रोहित पवार यांना ट्रोल केले. त्यास रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देत ट्रोलधारकांना गप्प बसविण्याचा प्रयत्न केला.

रोहित पवारांनी नवी मुंबईत ‘स्वराज्याचे पुनरागमन’ या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गौतम अदानींसाठी गाडी चालवण्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो. लपवून छपवून बाकी करतात तसं करत नाही. जर एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येत असेल आणि त्यांच्यासाठी आपण गाडी चालवली असेल तर त्यात गैर काय?.

या घटनेवरून भाजपाचे लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये. त्यांना तेवढंच कळतं. गौतम अदानींची गाडी चालवत असेन आणि त्याची चर्चा होत असेल तर होऊ द्यात, असंही ते म्हणाले. शरद पवारांनी आपल्या पुस्तकातही आपण अदानींना खूप वर्षांपासून ओळखतो असे सांगितलं असल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बारामती येथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. ‘बारामती अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान केंद्र उभारण्यात आलं आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोहित पवार यांनी अदानींचं सारथ्य केल्याने भाजपाकडून टीका होत आहे. भाजपाच्या या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.

गौतम अदानी यांचं स्वागत करण्यासाठी रोहित पवार स्वत: बारामती विमानतळावर उपस्थित होते. गौतम अदानी विमानतळावर उतरल्यानंतर रोहित पवार यांनी त्याचं स्वागत केलं. त्यानंतर रोहित पवार यांनी गौतम अदानी यांची गाडी स्वत: चालवत त्यांना विज्ञान केंद्रापर्यंत नेलं. यानंतर रोहित पवारांचे गाडी चालवतानाचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरले होते.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *