Breaking News

नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी

मराठी ई-बातम्या टीम

जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी पोलिसांकडून होणाऱ्या संभावित अटकेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र आज त्यावर न्यायालयाकडून अंतिम निर्णय न दिल्याने याप्रकरणी उद्या पुन्हा सुणावनी होणार आहे. त्यावेळीच सत्र न्यायालयाकडून नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही याचे उत्तर मिळणार आहे.

आमदार नितेश राणे यांच्यासाठी अॅड. संग्राम देसाई तर संदेश सावंत यांच्यासाठी अॅड. राजेंद्र रावराणे आणि सरकार पक्षातर्फे अॅड प्रदीप भरत व अॅड भूषण साळवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. आज अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय होत नसल्याने अॅड देसाई यांनी आमदार नितेश राणे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात विनंती केली पण न्यायालयाने नकार दिला. मात्र उद्या युक्तिवादानंतर सुनावणी होणार आहे.

राणे आणि सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर आज दिवसभरात जवळपास पाच ते सहा तास सुनावणी झाली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्या होणार आहे. पोलिसांनी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आतापर्यंत सहा संशयितांना अटक केली असून आमदार नितेश राणे व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केल्यानंतर अटकेच्या भीतीने जिल्हा व सत्र न्यायालयात दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्याच्यावर आज युक्तिवाद झाला. उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होईल असे सरकारी अॅड प्रदीप घरत यांनी सांगितले.

आजच्या सुनावणीनंतर सरकारी वकीलांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, त्यांनी त्यांचा युक्तीवाद केला तो आम्ही काळजीपूर्व ऐकला. त्यांना काय म्हणायचे आहे ते समजून घेऊन, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला उत्तर देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्याला उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. परंतु आमचा युक्तीवाद आज पूर्ण झालेला नाही. उद्या आमचा युक्तीवाद सुरू राहील तो पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला यावर अधिक बोलता येईल.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *