Breaking News

मंत्र्यांना व्टीटचा अट्टाहास, तब्बल दिड महिना उशीराने वेळापत्रक जाहिर ‘युपी’ची जबाबदारी असल्याने शिक्षण मंत्री दौऱ्यात व्यस्त

मराठी ई-बातम्या टीम

आपल्या विभागाचा मोठा निर्णय व्टीटवर चित्रफीत प्रसारीत करुन जाहीर करायचा, असा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा ह्ट्ट असतो. त्यांच्या या सुलतानी निर्णयामुळे यंदाच्या दहावी- बारावी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करायला तब्बल महिनाभराचा विलंब झाला असून त्याचा फटका ३२ लाख परिक्षार्थी विद्यार्थ्यांना बसल्याची माहिती पुढे आली आहे.

दहावी-बारावीच्या लेखी परिक्षा विद्यार्थी जीवनात महत्वाच्या मानल्या जातात. दरवर्षी या परिक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केल्या जातात. मागच्या वर्षी कोविड संसर्गाने परिक्षा न घेता मूल्यांकन करुन गुण दिले गेले. यंदा प्रत्यक्षात परिक्षा होत आहेत, दिड महिन्यापूर्वी पुण्यातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंत्री कार्यालयास वेळापत्रक पाठविल्याची माहिती येथील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली

मात्र, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या व्यस्त होत्या. गायकवाड यांच्याकडे काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उमेदवार निवड समितीवर गायकवाड असल्याने त्यांचे लखनौला वारंवार दौरे असतात. त्यामुळे त्यांना व्टीटरवर वेळापत्रक जाहीर करायला वेळ मिळाला नाही.

वर्षा गायकवाड या विभागाचा प्रत्येक निर्णय व्टीटवर जाहीर करतात. व्टीटवर स्वत:ची चित्रफीत असते. चित्रफीत बनवण्यास  गायकवाड यांना वेळ नाही. परिणामी अधिकाऱ्यांनी अनेकदा स्मरण देऊनही त्यांच्याकडून दहावी- बारावी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे शक्य झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शाळा व महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, यासाठी वेळेत परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करायचे, असा मंडळाचा दंडक आहे. मात्र तो मंत्री महोदय व्यस्त असल्याने मोडला गेला. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी मंत्री महोदयांना अनेकवेळा विचारणा केली. मात्र करते, करते म्हणत शेवटी गुरुवारी (ता.१६) सायंकाळी त्यांनी व्टिट केले.

दहावी-बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक मंत्र्यांच्या मान्यतेनंतर पुण्यातून प्रसिद्ध व्हायचे. फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ते मुंबईत प्रसिद्ध करण्याची प्रथा पाडली. एकतर यंदाच्या दहावी-बारावीच्या परिक्षा प्रत्यक्षात होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. तो दूर करण्यातही शालेय शिक्षण विभागाने विलंब केला. आता परिक्षा विलंबाने जाहीर केल्याने त्याचा फटका सुमारे ३२ लाख परिक्षार्थी विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाल्याची भावना पालक वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

प्लॅन बी :

राज्यात जानेवारीच्या शेवटी ओमायक्रॉनची लाट येईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. तसे झाल्यास या परिक्षांचे काय? दहावी- बारावीचे वर्ग ऑक्टोबर मध्ये चालु झाले. तेव्हापासून पार पडलेल्या घटक चाचण्यांची माहिती शाळा, महाविद्यालयांनी ठेवली आहे. परिस्थिती बिघडल्यास मागच्या वर्षी प्रमाणे मूल्यांकन करुन गुण देण्याचा पर्याय (प्लॅन बी) शिक्षण मंडळाने तयार ठेवला केला आहे.

Check Also

या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा मदतगार ठरणार?

लोकसभा निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यकर्त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *