Breaking News

भाजपा आमदार सुरेश धस यांच्या घोटाळ्याची ईडी आणि एसआयटी मार्फत चौकशी बीड जिल्ह्यात ४५० एकर जमीन परस्पर विकली: धस व निकटवर्तीयांचा १००० कोटींचा घोटाळा

मराठी ई-बातम्या टीम

बीड जिल्ह्यातील देवस्थळ (मंदिरे) आणि वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. माजी राज्य, महसूल मंत्री आणि भाजपाचे आमदार सुरेश धस आणि त्यांचे निकटवर्तीय यांनी खुल्या बाजारात देवस्थान व वक्फच्या १००० कोटींच्या बेकायदेशीर मालमत्ता विक्री केल्यातील प्रमुख आरोपी आहेत.

धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निकटवर्तीयांच्या विरोधात आजपर्यंत बीड जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी बीड जिल्ह्यातील एकूण ४५० एकर मुख्य जमीन त्यांच्या जवळच्या साथीदारांना हस्तांतरित केली होती. ज्यांनी नंतर ही जमीन खुल्या बाजारात विकली आणि या व्यवहारात मोठा नफा मिळविल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली.

नियमांनुसार, या जमिनी हैद्राबाद इनाम निर्मुलन कायद्यानुसार खिदमतमाश जमिनी आहेत. त्या विकण्यास कायद्याने परवानगी नाही. कारण त्याचे मालक ‘देव किंवा अल्ला’ आहेत. ज्याला कायद्याच्या भाषेत लीगल फिक्शन म्हणतात व त्या इनाम जमिनीचे मूळ भोगवटदार हे फक्त त्या जमिनीचे विश्वस्त म्हणजेच ट्रस्टी असतात.

प्राथमिक सरकारी तपासात धस यांच्या निकटवर्तीयांना जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्यामागे दलाल आणि राजकारणी यांच्यातील संबंध असल्याचे समजते. हे व्यवहार करताना या मंडळींनी  “बीड जिल्हाधिकारी व वक्फ बोर्डाचे बनावट शिक्के बनवले. खरेदी विक्रीकामी जे धनादेश वापरले ते एका क्रेडिट सोसायटीमध्ये बनवले गेले ज्याचे अध्यक्ष सुरेश धस असून हा जटिल घोटाळा एसआयटी मार्फत सर्व तपशील उघड करेल,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले.

देवस्थानच्या व मशिदीच्या इनाम जमिनी ह्यामध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून व महसूल खात्याच्या आशिर्वादाने जवळपास १००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक जमिनीच्या व्यवहारात शासनाचा महसूल बुडविण्यात आला व सामान्य नागरीकांची फसवणूक झाल्याचा संशय आहे.

ईडी कडे तक्रार :

धस यांच्या पुढाकाराने बीड जिह्यातील इनाम जमिनींचे तब्बल एक हजार कोटी रुपयांचे गैरव्यवहार मनी लँडरिंग प्रक्रिया वापरून झाल्याचा आरोप करणारी तक्रार मंगळवारी (१४ डिसेंबर) ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये  सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, शेख अब्दुल गनी यांनी अ‍ॅड.असीम सरोदे, अ‍ॅड.अजित देशपांडे, अ‍ॅड. अक्षय देसाई व अ‍ॅड. मदन कुर्हे यांच्या मदतीने दाखल केली आहे.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *