Breaking News

जाती जनगणना झाली नाही तर आरक्षण टिकणार नाही ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

जाती जनगणना झाली नाही तर कोणतंच आरक्षण टिकणार नाही. मंडलला कमंडलचा विरोध आहे हे लक्षात घेऊन एक व्हा असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज केलं. ओबीसी आरक्षण दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. मंडल आयोगाच्या अमंलबजावणीची घोषणा याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केली होती.

जाती जनगणनेला कमंडलचाच विरोध आहे, असं सांगत भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जाती जनगणना झाली नाही तर ओबीसी आरक्षण टिकणार नाही, मराठा आरक्षण मिळणार नाही, भटके विमुक्त आणि धनगरांची मागणीही पूर्ण होणार नाही. असा इशारा देत ते म्हणाले, आधी एकत्र राहू अन्यथा हातातलं जाईल.

शरद पवार यांच्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचा पाठिंबा होता म्हणूनच आरक्षण मिळालं. नीट आणि केंद्रीय कोट्यातील आरक्षण मोदींनी नव्हे तर अर्जुन सिंग यांनी दिलं होतं, याची आठवण त्यांनी करून दिली. जनार्दन पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांची आठवण करताना ते भावूक झाले.

केंद्रातओबीसी मंत्री आहेत, पण ते नावापुरते आहेत. बोलू शकत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

लोक भारतीचे अध्यक्ष, आमदार कपिल पाटील यांनी जाती जनगणनेची मागणी केली. ही जनगणना केवळ ओबीसी आरक्षणासाठी नव्हे तर मराठा, धनगर अरक्षणासाठीही आवश्यक असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. ५०% ची मर्यादा वाढवावी आणि तामिळनाडू प्रमाणे 9th Schedule चं घटनात्मक संरक्षण मिळवून द्यावं, अशी मागणीही केली.

काँग्रेस नेते, माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी सर्व राजकीय पक्षातील ओबीसी आमदारांनी एकत्र यावं आणि राजकीय दबाव निर्माण करावा, असं आवाहन केलं.

महाराष्ट्र ओबीसी संघटना कृती समितीने आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये शब्बीर अन्सारी, नारायण दादा मुंडे, अरुण म्हात्रे, डॉ. कैलास गौड, पल्लवी रेणके यांनीही मार्गदर्शन केलं. तर जालिंदर सरोदे, जयवंत पाटील, विलास घेरडे, प्रकाश शेळके, सचिन काकड हे निमंत्रक होते.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *