Breaking News

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी आणि चिडचिड दोन्ही होऊ लागली. केशव सारखा अंगणात येरझाऱ्या मारू लागला. इतक्यात एक शेंबड पोरगं धावत आलं रत्नाकर काका आला, रत्नाकर काका आला. केशवच्या जीवात जीव आला. त्याने अंगणातूनच रत्नाकरचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला. रत्नाकर येऊन अंगणात सुम्बच्या खाटेवर बसला केशवच्या बायकोनं चहा पाणी आणलं आणि रत्नाकरला घोळका करून सगळे उभे राहिले. केशवचा मुलगा जय मात्र घरात एका कोपऱ्यात बसला होता, रत्नाकर ने चहा पाणी घेतलं आणि सविस्तर बातमी सांगू लागला.

” दाद्या पोरगीवालं म्हणत्यात का बा कितीबी जमीन असली तरी पोराला मुंबई न्हायतर पुण्यात नोकरी निदान प्रायव्हेट कंपनीत असल्याशिवाय तरी देणार न्हाय म्हणून. ” गेले पंधरा वर्ष हेच वाक्य केशव ऐकत आला होता. त्याला वाटलं होतं पोरगी नात्यातली हाय म्हणून ही तरी पोर आपल्या पोराला होय म्हणल पण नाही. केशवचा पोरगा जय जवळ जवळ आता पस्तिशी ओलांडून गेलेला वयाच्या अठराव्या वर्षांपासून मुलगी शोधायला सुरुवात केलेली, शेतीचा खूपच मोठा पसारा असल्यामुळे, पोराच शिक्षण झालं नाही दहावीच झाली, बरं हे जयचंच नाही तर अख्या गावाचं आहे, पोरांची चाळीशी उलटूंनं गेली तरी लग्न होईनात. गेल्या दहावर्षात गावात एकही लग्न झालेलं नव्हतं. कोणी आपलं लग्न होईल याची अपेक्षाच सोडलेली तर कोणी पन्नाशी उलटून गेली तरी लग्नाच्या प्रतिक्षेत. कोणी म्हणे, शेती  करणारा मुलगा नको, मुलाला शहरांत नोकरी हवी, सरकारी असेल तर उत्तम नाहीतरं प्रायव्हेट चालेल, घर मोठं हवं गाडी हवी त्याच्याकडे, शहरात एक रूम आणि सोबत नोकरी, वेगवेगळ्या कारणांनी लग्न कॅन्सल होत, गावांत भरमसाठ असणारी शेती सोडून शहरात जायला कोणी तयार नाहीत. त्यामुळे मुलींकडच्या अपेक्षा पूर्ण  होईना.

त्यामुळे कोणाची लग्न जुळेचना केशवच्या घरात आज नेहमीसारखी शांतता नव्हती, सगळे चिडीचूप जेवून लाइटी घालवून अंधारात गडप व्हावे तसें झाले. केशवला काय करावे कळेना. त्या रात्री केशवला झोप लागेना. जयने तर आशा सोडलेली, आपलं लग्न होतं नाही गावातल्या पोरांसारखं असंच झंड म्हणून आयुष्य काढावं लागणार या विचारात तसाच झोपी गेला. काही दिवसांनी केशवाला गावातल्या मंग्याने सांगितलं की, एक माणूस आहे तो पैसे घेतो पण लग्न जुळवून देतो म्हणून. केशवने लगेच त्याला गाठलं. लग्न जुळवनाऱ्याने एकूण सत्तर हजार फि सांगितली, सुरुवातीला तीस हजार बाकी लग्न जुळल्यावर आणि जुळलं नाही तर सुरुवातीचे वीस हजार मिळणार नाहीत असा एक करार केला. लग्न जुळवणाऱ्या माणसाने महिना झाला तरी काय मुलगी मिळतेय, नाही मिळते याचा तपशील दिला नाही. मंग्यालाही त्याचा काही पत्ता लागेना, शेवटी आपलें पैसे बुडाले याची खात्री केशवला झाली.

पैशाचं त्याला एवढं टेन्शन नाही आपल्या पोराचे चार हात व्हावे एवढीच त्याला अपेक्षा होती. दिवसामागून दिवस जाऊ लागले जया सुद्धा आता विचित्र वागायला लागला. बापाला कळलं की, याला धंदा करणाऱ्या बाईचा नाद लागला आहे. आपली शारीरिक गरज भागवायला ज्यांची लग्न झाली नाहीत ते सती बाजारात जात असत. गावच्या पोरांनी जयला उकसवून एकवेळ बाजारात घेऊन गेले आणि त्यानंतर जयाला मात्र ते भारी वाटू लागलं. तो आता आठवड्यातून एकदा जाऊ लागला पण. केशव काही बोलेना. वाढत्या वयाची पोटाची भूक भागवू शकतो पण बाकीच्या गरजा ही महत्वाच्या आहेत हे समजून असताना देखील, त्याला जरा वाईट वाटतच होतं. पण हे सगळं निमूटपणे सहन करण्या पलीकडे काहीच पर्याय नव्हता. शेजारच्या गावातून केशवच्या मित्राच्या पोराच्या लग्नाची पत्रिका मित्राने पाठवली ती हातात घेताच केशवला राहवलं नाही. केशव दुसऱ्या दिवशीच मित्राच्या घरी निघाला. केशव सासन गांवात उतरला सगळीकडेच दिवाळी असल्याचं त्याला दिसलं तो इतके वेळा आपला मित्र जग्गू कडे आला पण असं पहिल्यांदाच पाहत होता, नेहमी प्रमाणे जग्गूच्या घराकडे निघाला जग्गूच घर तिथून गायब होतं त्या  ठिकाणी एक भला मोठा बंगला उभा होता. केशव थांबला बाजूला इस्त्रीवाला होता त्याला विचारलं

” दादा ते जगनाथ पवारांचं घर समोर होत ते कुठं गेलं, नाय म्हणजे इथं आसपास नाय ना, कुठं भाड्यान राहायाला वैगरे गेले ” इतक्यात  इस्त्रीवाला माणूस हसत हसत बोलला

“दादा समोर बंगला दिसतो का नाय त्योच जग्गूदादाच घर हाय ” केशवला वाटलं आपली मस्करी करतो आहे, तो बंगल्याच्या गेटपाशी येतो तिथे दोन बाजूला दोन बॉडीगार्ड उभे असतात त्यांना  विचारतो ” ते जग्गू… नाय म्हणजे जगन्नाथ पवार इथे राहतात  काय ” बॉडीगार्ड एकदा केशवकडे बघतात आणि विचारात ” तुम्ही कोण आणि काय  कामं आहे? ” केशव जरा दबकत बोलतो नाही ” मी त्यांचा मित्र आहे भेटायला आलोय ” बॉडीगार्ड वॉकीटॉकी ऑन करून बोलू लागतो. त्यानंतर तो पुन्हा गेट उघडून पाहतो बाहेर येऊन सांगतो ” तुम्ही आतमध्ये जाऊ शकता” आणि केशवला हाय असल्यासारखं वाटतं आणि केशव गेटमधून आतमध्ये जातो. बंगल्या समोर दोन गाड्या, स्विमिंग पूल, वेगवेगळ्या फुलझाडांच्या कुंड्या. केशवला अजून ही खात्री वाटत नव्हती की, आपण जग्गूच्याच घरात आलोय म्हणून काय. बंगल्याच्या आतमध्ये गेल्यावर त्याला आपण सिनेमातल्या एखादया घरात आल्याचा फील येऊ लागला, समोर जग्गू सफेद शर्ट सफेद पॅन्ट घालून निळ्याशार सोफ्यावर बसला होता. जग्गूने केशवला पाहिलं आणि आनंदाने सोफ्यावरून उठला.

“आर केशा हिकडं कसा? मायची… अगदीच सरप्राईज का काय ते बोलतात ते ” आणि हसायला लागतो. “ये बस बस” म्हणून बसायला लावतो चहापाणी नाष्टा होतो. हे सगळं भारावून टाकणार होतं. शेवटी पहिला प्रश्न जो पडायचा तो केशवच्या जिभेतनं तो पडलाच “. आर जग्ग्या तुला काय लॉटरी बिटरी लागली का काय “. जग्गू काहीच न बोलता त्याला स्विमिंग पूल जवळ घेऊन आला. तिथल्या एका बाकावर जग्गु बसला आणि बाजूला केशवलाही बसायला लावलं, एक मोठी शांतता पूर्ण झाल्यानंतर जग्गू  सगळं सांगायला सुरुवात करतो.” आयुष्यात शेतीवर आपल्या नंतर मागच्या पिढीन पोट भरलान या नंतरच्या पिढीला शेती म्हणजे शापच वाटाय लागलाय, माझ्या मोठ्या पोराचं लग्न झालं पण माझ्या बारक्या पोराचं होईना एकचं असायचं बावा पोरगा कामाला हाय का मुंबई किंवा पुण्यात, नायतर निदान मोठं घर गाडी हवी, बऱ्याच बऱ्याच नाना तर्हेच्या अपेक्षा ऐकून ऐकून पोराचं वय वाढतं चाललं शेवटी ठरवलं साला सगली शेती विकायची आणि असा बाजार मांडायचं. आता ठीक चाललंय. हे सगळं ऐकून केशव कावरा बावरा होऊन बोलला “. मी असं केलं तर होईल का रं नीट माझ्या पोराचं होईल काय लग्न? ” जग्गू बोलला होईल म्हणजे झालं असं समज तसंही साला काय राहिलाय आता शेतीत. आपल्या पोरांचं सुख तेच आपलं “. नंतर खूप गप्पा होतात केशव जग्गूलाच आपल्या जमिनीसाठी एखादा पार्टी बघायला सांगतो जग्गू पार्टीचं डील करतो. पार्टी जमीन घ्यायला तयार आहे असं कन्फर्म झाल्यावर केशव आनंदाने घराकडे निघतो. काही दिवसामागून दिवस जात राहतात बघता बघता केशवाच्या विटांच्या घराच्या जागेवर भला मोठा बंगला उभा राहिला दोन तीन गाड्या घरासमोर नोकर चाकर. सगळं काही ठीक झालं पण, जय खूष नव्हता त्याचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखा वागत होता चार पाच मुलींनी होकार दिला होता पण जय आपल्या खोलीत डांबून घेतल्यागत असे.

एकदिवस खूप वेळ दरवाजा उघडला नाही म्हणून जेंव्हा तोडला तेंव्हा जय पंख्याला लटकलेला दिसला. केशव हे बघून तिथल्या तिथं कोसळला. केशवाला जेंव्हा शुद्ध आली तेंव्हा दहा दिवस होऊन गेलेले केशव एका प्रेतासारखा पडून  होता. केशवच्या बायकोनेच सांगितलं. ” पोराला आजार झाला होता आणि तो आजार म्हणे कधीच बरा होणारा नव्हता म्हणून लग्नानंतर पोरीचं आयुष्य खराब नको म्हणून त्यानं असं केलं “.असं म्हणून जयने लिहिली चिठ्ठी दाखवते. केशव बरा शरीराने झाला, पण एवढ्या मोठ्या घरात तो एक शापित आत्मा असल्यावानी फिरू लागला.

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *