Breaking News

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटन आणि दहिसर कांदळवनाचा विकास आराखडा सादर करा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन उद्यान’ उभे राहणार आहे. या उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून उद्यानाला पोहोचणारा रस्ता सहा महिन्यात करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिम गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक सरोज गवस आदी उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार यांनी अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनाला प्राधान्य देत परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सूचित करुन कर्नाळा परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी अलिबाग येथील वन विभागाची मान्यता घेवून स्थलांतर करावे. कोणत्याही परवानग्या, मान्यता वन विभागाकडून प्रलंबित राहता कामा नये. कर्नाळा किल्ल्याची डागडुजी, दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती गवस यांनी यावेळी सादरीकरण केले. आराखड्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क, मुलांची खेळाची जागा, धबधबे, पुलांची दुरूस्ती, पाथवे, बचत गटांचे कॅन्टीन, प्रवेशद्वारावर आणि परिसरात सीसीटीव्ही, विद्युतीकरण, पक्षी निरीक्षण पॉईंट आदींचा समावेश आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून १२ कि.मी. तर मुंबईपासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे मुंबईसह आसपासचे हजारो पर्यटक भेट देत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. १२.१०९४ चौ.कि.मी. क्षेत्राच्या अभयारण्यामध्ये पक्षांच्या १४७ प्रकारच्या जाती आहेत. हिवाळ्यात ३७ स्थलांतरीत पक्षी येथे पहावयास मिळतात. विविध प्रकारच्या ६४२ वृक्षप्रजाती येथे आहेत. ११ प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारचे सर्प, ५ प्रकारचे सरडे आणि बेडूक, १० प्रकारचे कोळी आणि फुलपाखरांच्या ५६ प्रजातीही येथे अस्तित्वात आहेत. या सर्वांचे जतन करून निसर्ग पर्यटन आराखडा अंतिम करावा.

दहिसर कांदळवन उद्यानाचा रस्ता सहा महिन्यात करावा- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन उद्यान’ उभे राहणार आहे. या उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून उद्यानाला पोहोचणारा रस्ता सहा महिन्यात करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन उद्यानाबाबत आयोजित बैठकीत मंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, मनपाचे कार्यकारी अभियंता (रस्ते) सु.बा. बाविस्कर, कार्यकारी अभियंता (विकास) रा.आ. जाधव, उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस आदी उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले, मानवी जीवनासाठी आणि नैसर्गिक जैवविविधता टिकून राहण्यासाठी कांदळवनाचे महत्व आहे. कांदळवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याची शास्त्रीय माहिती जनतेला होण्यासाठी आणि त्यांच्या मनात कांदळवन परिसंस्थेबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी मुंबईत कांदळवन उद्यान उभे राहत आहे. दहिसर आणि गोराई येथे हे उद्यान उभे राहणार आहे. त्यातील गोराई कांदळवन उद्यानाचे काम सुरू झाले आहे. दहिसर येथील कांदळवनला पोहोचणारा रस्ता तयार करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने त्वरित आराखडा तयार करावा. नियमानुसार त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुंबईसह या जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला इशाराः मान्सूनपूर्व पावसाची हजेरी राज्यातील बहुतांष जिल्ह्यात तापमानात घट पण उखाडा नेहमीप्रमाणे

हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे राज्यात ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्याचं पाहायला मिळतं. काही जिल्ह्यांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *